((अँकर))
----
डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहायता योजनेत मदत वाढली
----
अनुसूचित जाती-जमातीतील गरजू रुग्णांना मिळणार आर्थिक आधार
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १० : गंभीर आजारांवरील महागडे उपचार आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात असताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील गरजू रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहायता योजनेत भरीव वाढ करण्यात आली आहे. विविध गंभीर आजारांसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहायाची रक्कम वाढविण्यासोबतच पात्र आजारांची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पात्र रुग्णांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येते. उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता योजनेतील मदतीत करण्यात आलेली वाढ गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---
कोणत्या आजारासाठी किती मदत?
योजनेअंतर्गत अवयव प्रत्यारोपणासाठी ३ लाख ५० हजार रुपये, तर किडनी शस्त्रक्रिया व डायलिसिससाठीही ३ लाख ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळणार आहे. कॅन्सरवरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिओथेरपीसाठी २ लाख ५० हजार रुपये, तर मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये मदत मिळेल.
याशिवाय इतर जीवघेण्या गंभीर आजारांसाठी २ लाख रुपये, हृदय शस्त्रक्रियेसाठी १ लाख ५० हजार रुपये आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
---
वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी
योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
---
कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मान्यताप्राप्त रुग्णालयाचे उपचाराचे अंदाजपत्रक, वैद्यकीय अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. बँक पासबुकची प्रत अनिवार्य असून, कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्जाच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.
---
जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकाऱ्याची शिफारस
योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्या शिफारस पत्रासह डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानकडे सादर करावा.
नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र रुग्णांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा आणि महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
----