ABD26J79979 (एका बातमीत दोन बातम्या)
---
कुलसचिवपदी डॉ. संजय कवडे
मराठवाड्यातून १८ उमेदवारांचे अर्ज
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी सूत्रे डॉ. संजय साहेबराव कवडे यांनी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडून मंगळवारी (ता.२२) स्वीकारली. पूर्णवेळ कुलसचिवाची निवड होईपर्यंत हा पदभार असणार आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी ही नियुक्ती केली. डॉ. अमृतकर यांनी कुलसचिव पूर्णवेळ पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे कार्यवाहक कुलसचिव या पदाचा त्यांनी सोमवारी (ता.२१) राजीनामा दिला. यानंतर रिक्त पदावर आस्थापना विभागच्यावतीने डॉ. कवडे यांची ‘ऑफीसेटिंग कुलसचिव’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सोमवारी (ता. २१) सायंकाळी काढण्यात आले.
डॉ. कवडे हे गेल्या २१ वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत आहेत. कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव, उपकुलसचिव, वित्त व लेखाधिकारी आदी पदांवर त्यांनी कार्य केले. वाणिज्यशास्त्र विद्याशाखेत त्यांनी पीएच.डी. प्राप्त केलेली आहे. डॉ. अमृतकर यांनी राज्यशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी १९ जानेवारी २०२४ ते २१ सप्टेंबर २०२६ अशा दोन वर्षे आठ महिने कुलसचिव पदावर राहिले.
----
कुलसचिव पदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज
कुलसचिव व धाराशिव उपपरिसर संचालक या पूर्णवेळ पदासाठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात अर्ज मागविण्यात आले होते. कुलसचिव पदासाठी एकूण १८ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. तर धाराशिव उपपरिसर संचालक पदासाठी १४ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. ‘हॉर्ड कॉपी’ जमा करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर सायंकाळी ६ पर्यंत आहे. त्यानंतर एकूण किती अर्ज आले याबद्दलचे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यापासून सप्टेंबर २०२२ पासून कुलसचिवपदी प्रभारी नियुक्ती आहे.
---