विश्वांभर देशमाने यांचा सेवागौरव
बीड ः कामातील तत्परता, निर्व्यसनी जीवन आणि सत्यनिष्ठेच्या बळावर सेवेत जपलेला प्रामाणिकपणा हे डॉ. विश्वांभर देशमाने यांचे वैशिष्ट्य आहे. माणसे जोडण्याची त्यांची वृत्ती संस्थेच्या वाटचालीत प्रेरणादायी ठरल्याचे गौरवोद्गार भाजप नेते व संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काढले. के.एस.के. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक डॉ. देशमाने यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त बुधवारी (ता.४) दिमाखदार सेवागौरव सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. दीपाताई क्षीरसागर होत्या. त्यांनी देशमाने यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचे कौतुक केले. डॉ. विश्वांभर देशमाने यांनी स्व. केशरकाकू यांच्या प्रेरणेमुळे काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमेर सिद्दीकी, नागेश तांबारे, मुन्ना गायकवाड, डॉ. सुधाकर गुट्टे आणि प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर उपस्थित होते.
------
छत्रबोरगावच्या दोन लेकींची नासा अन् इस्रोला भरारी
माजलगाववः जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इस्रो-नासा निवड परीक्षेतून छत्रबोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी जागतिक स्तरावरील वैज्ञानिक संस्थांमध्ये भरारी घेतली आहे. तृप्ती अशोक अंभुरे हिची अमेरिकेतील नासा सहलीसाठी, तर संस्कृती बालासाहेब जाधव हिची श्रीहरिकोटा येथील इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे. या यशासाठी शिक्षक चंद्रकांत लगड यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक गणेश गिरी, गटशिक्षणाधिकारी कल्पेश दळवी, केंद्रप्रमुख प्रकाश शिंदे यांच्यासह शिक्षण अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनी या विद्यार्थिनींचे मोठे कौतुक केले आहे.
------
माजलगाव ः विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व गणवेशाचे वाटप आमदार प्रकाश सोळंके, मंगला सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.
‘शिक्षणाच्या बळावर गरिबीवर मात करा’
माजलगाव ः आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असली, तरी शिक्षणाची ओढ आणि जिद्दीच्या जोरावर यशस्वी व्हावे. पसायदान सेवा प्रकल्प आणि माजलगाव विकास प्रतिष्ठान सदैव पाठीशी असल्याचा विश्वास आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगला सोळंके यांच्या पुढाकाराने ५०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना रविवारी (ता.१) गणवेश आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. गोवर्धन दराडे यांनी गरिबीत जन्मणे पाप नसून अज्ञान दूर करण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. मंगला सोळंके यांनी विद्यार्थ्यांना आनंद देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्राचार्य अन्वर शेख यांनी प्रास्ताविक, तर वरुण तौर यांनी सूत्रसंचालन केले.
------
अंजली सावळकर-इंगळे यांना डाॅक्टरेट
अंबाजोगाई ः येथील डॉ. अंजली शिवाजीराव सावळकर (इंगळे) यांनी वनस्पतीशास्त्र या विषयात डाॅक्टरेट पदवी संपादन केली. येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या अंजली सावळकर यांनी वनस्पतीशास्त्र विषयात सखोल संशोधन करून ही पीएच. डी. पदवी संपादन केली. या संशोधन कार्यासाठी त्यांना संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. आर. एन. कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल निवृत्त प्राचार्य डॉ. दामोदर थोरात यांच्यासह कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.
-----
मंजिरी थळकरी हिची एमबीबीएससाठी निवड
युसुफ वडगाव ः येथील मंजिरी वैजनाथ थळकरी हिची नीट परीक्षेतून अहिल्यानगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी निवड झाली. या यशाबद्दल विद्यालय आणि शालेय व्यवस्थापन समितीतर्फे तिचा व तिचे पालक वैजनाथ दगडू आप्पा थळकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. यु. भोसले, शिवदास थळकरी, शिवहार बाप्पा थळकरी, विजयकुमार भुमकर, जनक राऊत, प्रमोद जाधव, हनुमंत थळकरी आणि दिलीप लोंढे उपस्थित होते. तिच्या यशाबद्दल दीपक दादा घुमरे, यु. बी. सुकाळे, शेख एम. बी., चव्हाण एन. एन., घुमरे प्रदीप, प्रा. गडकर, मुकदम, खराडे, सुंखावार, गडकर बी. एम., गलांडे, शितोळे, सुकेशनी, माने, वाणी, राठोड, चव्हाण व मुळे यांनी अभिनंदन केले.