((मेन))
----
प्रकल्प २२५, जलसाठा आठ टक्केच
--
पावसाअभावी धाराशिव जिल्ह्यात जलसंकटाची चाहूल
--
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. ३० : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याचा अवघा एक महिना शिल्लक असताना जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या आठ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील एकूण २२५ प्रकल्पांपैकी ११९ प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला (जोत्याखाली) गेला असून, २० प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने आणि सप्टेंबरमधील पावसाबाबत मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थितीचे संकट गडद झाले असून, त्याच्या झळा आतापासूनच शेतकऱ्यांना बसू लागल्या आहेत.
शेतकरी अन् पिकांवर संकट
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरिपाची सोयाबीन, कापूस व इतर पिके कोमेजून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील उरलेला साठा आरक्षित ठेवण्यात आला असून, या प्रकल्पांतील पाण्यावर अवलंबून असलेली ऊस पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाला नाही, तर जिल्ह्याला भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
---
प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती
प्रकल्प...संख्या...सध्याचा उपयुक्त साठा (दलघमी)...टक्केवारी...मागीलवर्षीचा साठा
मोठे प्रकल्प (सिना कोळेगाव)...१...०.०० ०.००...१००
मध्यम प्रकल्प...१७...१७.७२...८.६२...८७.७४
लघू प्रकल्प...२०७...४२.९५...९.९८...६४.८५
एकूण...२२५...६०.६७...८.३६...७५.६६
-----
तालुकानिहाय पावसाची स्थिती
एक जून २०२६ पासून जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या ७७०.७० मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत सरासरी अवघा ३०२.३८ मिमी (३९.२३ टक्के) पाऊस झाला आहे.
कमी पाऊस झालेले तालुके : लोहारा (२१६.५३ मिमी), तुळजापूर (२५८.८० मिमी) आणि उमरगा (२७१.९० मिमी).
मध्यम पाऊस : परंडा (२७८.४० मिमी), धाराशिव (२८९.७० मिमी), वाशी (३३१.४० मिमी), भूम (३७६.०० मिमी) आणि कळंब (३९६.३० मिमी).
----
आता भिस्त सप्टेंबर व परतीच्या पावसावर
जिल्ह्यात मॉन्सूनच्या दोन महिन्यांत म्हणजे जून-जुलैमध्ये अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यावर खरीप पेरण्या झाल्या. सुरवातीच्या काळात पिकेही चांगली आली. मात्र, ऑगस्ट महिना पावसाची काही भागांतील हलकी हजेरी वगळता कोरडा गेला. त्यामुळे सोयाबीन पिकांनी माना टाकल्या असून, आता पाऊस पडला तरी उत्पन्नाची आशा मावळली आहे. या परिस्थितीत खरिपातील हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असला, तरी आगामी वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची आणि विहिरींच्या पातळीची सर्व भिस्त आता सप्टेंबर महिन्यातील पाऊस व परतीच्या पावसावरच असल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.