दुष्काळग्रस्त नागरिकांना तातडीने
मदत उपलब्ध व्हावी : देशमुख
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ४ : दुष्काळाचे संकट मोठे असून, या परिस्थितीत शासन व प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना पाणी, चारा यासह आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली. काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य गावांगावात नागरिकांच्या समस्या जाणून घेत असून, विविध उपाययोजनांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत, असेही ते म्हणाले.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी लातूर येथील काँग्रेस भवनात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक घेतली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पीकविमा, शैक्षणिक शुल्क, रेशनचा प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांचे प्रलंबित अनुदान याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
अनेक गावांमध्ये नागरिकांना रेशन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी असून, विविध शासकीय योजनांचे अनुदानही प्रलंबित आहे. हे अनुदान लाभार्थींना मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत नागरिकांना आवश्यक पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना कराव्यात, यावरही चर्चा झाली. सध्या पीकविम्याच्या अनुषंगाने कापणी प्रयोग सुरू आहेत. मात्र दुष्काळाची व्यापकता लक्षात घेता केवळ कापणी प्रयोगाच्या आधारे मदत न करता बाधित शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
बैठकीत दुष्काळग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
-----
LTR26B15133
लातूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना धीरज देशमुख.