जिल्ह्यात १४५ प्रकल्पांत केवळ १४ टक्के पाणीसाठा
आमदार संभाजी पाटील निलंगेकर; मदतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १३ ः जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ सदृश्य नव्हे, तर दुष्काळच आहे. सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. ते सकारात्मक आहेत. गुरुवारी (ता.१७) ते निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील, अशी माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी पाण्याअभावी जळालेले सोयाबीन व शेंगा न लागलेले सोयाबीन पत्रकारांना दाखवले.
जिल्ह्यातील १४५ प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची ४० टक्के तूट आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाचे शंभर टक्के पीक गेलेले आहे. पावसाअभावी रब्बीची आशाही धूसर झाली. दुसरीकडे भूजल पातळीदेखील खाली जात आहे. टँकर, अधिग्रहणाची मागणी वाढत आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा उशिरा झाला. त्यात ७५ टक्के शेतकऱ्यानी धाडसाने पेरणी केली. पण गेल्या काही दिवसातील पावसाने दिलेल्या खंडामुळे सोयाबीन जळून जात आहे. काही ठिकाणी हिरवे दिसत असले तरी त्याला शेंगा नाहीत. गवत आल्यासारखे सोयाबीनची अवस्था झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तो पडलाच तर केवळ भिजवन होईल. न भरून येणारे नुकसान झाले आहे. ता. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडवणीस निश्चितच यावर सकारात्मक निर्णय घेतील, असे निलंगेकर म्हणाले. यावेळी संजय दोरवे आदी उपस्थित होते.