दुष्काळामुळे बालमजुरी वाढण्याची भीती
-
शाळाबाह्य मुलांचा धोका; रोहयो कामांसह गावनिहाय सर्वेक्षणाची गरज
वैजापूर, ता. १५ (बातमीदार) : दुष्काळामुळे बहुतांश शेतकरी, शेतमजूर कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांचे नुकसान आणि शेतीकामांमध्ये झालेली मोठी घट यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे मजुरांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. या स्थलांतराचा थेट फटका लहान मुलांच्या शिक्षणाला बसणार असून, बालमजुरीचा धोका वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे.
रोजगाराच्या शोधात भटकंती करणाऱ्या कुटुंबांसोबत जावे लागल्याने मुलांचे शिक्षण अर्धवट सुटते. अशी मुले हॉटेल, ढाबे, वीटभट्ट्या, बांधकाम स्थळे किंवा किरकोळ दुकानांमध्ये अल्प मोबदल्यात कामाला जुंपली जाण्याची दाट शक्यता असते. यामुळे मुलांचे बालपण आणि आरोग्य धोक्यात येते. ही संभाव्य परिस्थिती रोखण्यासाठी ग्रामपंचायत, शिक्षण, महसूल आणि कामगार विभागाने संयुक्तपणे गावनिहाय सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा तातडीने शोध घेणे आवश्यक आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसून, स्थलांतर रोखण्यासाठी दुष्काळग्रस्त गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करणे, वेळेत अन्नधान्य पुरवणे आणि शाळाबाह्य मुलांसाठी हंगामी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हाच यावर प्रभावी उपाय ठरणार आहे, असे सूर शिक्षणतज्ज्ञांमधून उमटत आहे.
-
प्रतिक्रिया
मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर शहरात नऊ ठिकाणी धाडी टाकून १४ बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. तसेच या वर्षी जूनअखेर केलेल्या कारवायांदरम्यान सहा बालकामगारांना मुक्त केले आहे. ग्रामीण अथवा शहरी भागातील हॉटेल्स, दुकाने व इतर आस्थापनांमध्ये बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, संबंधित मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- एस.टी. राजपूत
सहायक कामगार आयुक्त, छत्रपती संभाजीनगर