दुष्काळाच्या झळा...
---
फोटो ओळी
जळकोट : तालुक्यातील सोरगा येथे पीक कापणी प्रयोग करताना तहसीलदार राजेश लांडगे, मंडळाधिकारी हंसराज जाधव,कृष्णा घुमनवाड, तलाठी बर्गे, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी कांबळे, कृषी सहायक बाचपल्ले, शेतकरी संजय सकनुरे आदी.
----
आता तुमीच सांगा सायेब, वरीस कसं काढायचं?
---
जळकोट तालुक्यात पीक पंचनाम्याच्या वेळी शेतकऱ्यांचा सवाल, पाणीटंचाईचे संकट गडद
विवेक पोतदार
जळकोट, ता. ६: ‘‘खरिपात पेरणीसाठी उसनवारी केली, बँकेचे कर्ज काढले, पदरमोड करून खते-बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली पण, ऐन शेंगा-बोंडं भरण्याच्या काळात पावसानं दगा दिला, आता तुमीच सांगा सायेब, वरीस कसं काढायचं?,, असा सवाल पंचनाम्यासाठी आलेल्या प्रशासनाच्या पथकाला शेतकरी विचारत आहेत.
पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत सोन्यासारखी पिके करपून गेली. कडक उन्हाने जमिनीत ओलावा उरला नाही. त्यातच उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हा डोंगरी तालुका असून सर्वसाधारण हलक्या प्रतीची जमीन सर्वाधिक आहे. खरिपाचे ३१ हजार हेक्टर इतके क्षेत्र असून त्यावरील पिकांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. एकवेळेस ओला दुष्काळ परवडला कारण पाणी तरी मुबलक मिळते. त्यामुळे जनावराच्या चारा-पाण्याची समस्या नसते. काही प्रमाणात रब्बी घेता येते.परंतु यावर्षी सारखा कोरडा दुष्काळ हानिकारक असतो असे अनुभवी शेतकरी सांगत आहेत.
कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण निसर्गाने साथ सोडली. अशी स्थिती असून येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत दिवस कसे काढायचे, पिण्याच्या पाण्याचे काय होईल, पशुधन कसे सांभाळायचे, लेकरांचे शिक्षण, सण वार उत्सव कसे साजरे करायचे, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.
पाझर तलाव, ओढ्या नाल्यात कुठेच पाणी दिसत नाही. शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला. सोयाबिनचे सर्वाधिक क्षेत्र असून अलीकडे तेच मुख्य पीक बनले आहे. त्यापाठोपाठ कापूस, तुरीचे पिक असून तेही वाळत आहे. आता मिळणाऱ्या पीकविमा व अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ४७ गावांचा हद्दीतील वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे आणि पशुधनाच्या चाऱ्याचे मोठे संकट
उभे आहे.
तहसील,पंचायत समिती व तालुका कृषी विभाग यांच्या पथकामार्फत सर्व बाधित गावांमध्ये पिकांचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन केली. या समित्यांकडून शुक्रवारपासून (ता. दोन) प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.
---
यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. यासंदर्भात आमदार संजय बनसोडे यांनी आढावा बैठक घेऊन उपाययोजनासंदर्भात सूचना दिल्या असून शासन निर्देशानुसार प्रशासन सज्ज आहे. संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले जात आहे.
-ऐश्वर्या चितारी, गटविकास अधिकारी, जळकोट
पावसाच्या भरवशावर पेरणी केली, पिके चांगली आली असताना पावसाने दगा दिला. पाण्याअभावी आता डोळ्यांदेखत पिके करपली. केलेला खर्चही वसूल होणार नाही. रब्बी पेरणीची आशा मावळली आहे.आता वर्ष कसे काढायचे, पशुधन जगवायचे कसे, असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत. पीकविमा व शासनमदतीची प्रतीक्षा आहे.
-पांडुरंग वाघमारे, शेतकरी
----
भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत प्रशासन असून नुकसानीचे पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
-सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी, उदगीर
---