दुष्काळ जाहिर करुन;
५० हजारांची मदत द्या
परभणी पंचायत समितीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २० ः जिल्ह्यात मागील ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली असून सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी पंचायत समिती परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात सभापती रवी चव्हाण व सर्व सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. पावसाळा सुरू असतानाही गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील हाताशी आलेली पिके सुकून वाळत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान होत असतानाच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे सरसकट अनुदान मंजूर करून त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती रवी चव्हाण यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
--------------