सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
भूम : पावसाने मोठी ओढ दिल्याने भूम तालुक्यातील खरीप पिके करपून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे भूम तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पेरणीनंतर दीड ते दोन महिने पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाढता उत्पादन खर्च, बियाणे व औषधांची थकीत बिले आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सर्व बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, पीकविमा वितरित करावा आणि नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
..................
BMH26A09663
भूम : हिवर्डा शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद कुटे, उपाध्यक्ष भागवत मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
हिवर्डा शालेय समिती अध्यक्षपदी कुटे
भूम : हिवर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. पालक व शिक्षकांच्या सहभागातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पालक सदस्यांमधून अरविंद कुटे यांची अध्यक्षपदी, तर भागवत मुंडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. सदस्य म्हणून सुरेश गोपाळघरे व युवराज काळे यांची निवड झाली. महिला प्रतिनिधी म्हणून राधा मुंडे, प्रतीक्षा मुंडे, दीपाली भोसले, गीतांजली मुंडे, स्वाती मुंडे, निलावती मुंडे व प्रियांका मुंडे यांची निवड झाली. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून रमेश लगाडे, तर सदस्य सचिव म्हणून प्रमोद ठाकरे यांची निवड करण्यात आली. बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव, भौतिक सुविधांचा विकास आणि पालकांचा सहभाग यावर चर्चा झाली.
.....
टंचाई आराखड्यासाठी नियोजन बैठक
भूम : आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यात टंचाई निवारण नियोजन बैठक मंगळवारी (ता. आठ) पंचायत समिती सभागृहात झाली. गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोतांचा वापर आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. तसेच पावसाअभावी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करण्यात आले. प्रथम कच्चा टंचाई आराखडा तयार करून त्यावर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. प्राप्त सूचना व आवश्यक सुधारणा समाविष्ट करून अंतिम आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण, तहसीलदार जयवंत पाटील, गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
......................
UMR26A18341
उमरगा : कदेर येथे वृक्षारोपण करताना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड, सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, रेखा इंगळे व महानंदा कलबुर्गे.
‘वृक्षसंगोपन ही प्रत्येकाची जबाबदारी’
उमरगा : आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि निरोगी पर्यावरणाची भेट देईल. त्यामुळे केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संगोपनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड यांनी कदेर येथे केले. ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी (ता. ८) वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, डिजिटल संकेतस्थळाचे लोकार्पण आणि महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात वृक्षदिंडीने झाली. त्यानंतर वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण करण्यात आले. नव्या डिजिटल संकेतस्थळामुळे नागरिकांना विविध सेवा घरबसल्या मिळून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येईल, असा विश्वास सभापती ॲड. आकांक्षा चौगुले यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दिव्यांगांना अर्थसाहाय्य आणि अंगणवाडी बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरात ८२२ महिलांची तपासणी झाली.
.....................
‘पाणीटंचाईत शासकीय बांधकामे थांबवा’
जेवळी : जेवळी (ता. लोहारा) येथे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे सुरू असलेल्या शासकीय बांधकामांसाठी पाण्याचा वापर थांबवून ही कामे तात्पुरती स्थगित करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहित लक्ष्मण कारभारी यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावात सिमेंट रस्ते, नाल्या व शासकीय इमारतींची बांधकामे सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे. दुसरीकडे पावसाअभावी गावातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी घटली असून ग्रामस्थांना आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी व पशुधनासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत निवेदन प्राप्त झाले असून वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामपंचायत अधिकारी बी.जे. गौतम यांनी सांगितले.
......................
शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याची मागणी
कळंब : पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान होत असताना महावितरणकडून शेतीपंपांसाठी आठ तासांऐवजी चार तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वाढीव भारनियमन तातडीने बंद करून पूर्वीप्रमाणे नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणच्या लातूर विभागीय कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांत ‘आपत्कालीन भार नियमन’च्या नावाखाली रात्री वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांना सिंचनाची गरज आहे. मात्र, अनियमित वीजपुरवठ्यामुळे विहीर व बोअरवेलद्वारे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. शेतीपंपांसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करून त्याची पूर्वसूचना शेतकऱ्यांना द्यावी आणि साधारण आठ तास नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
..................
फोटोओळ
अणदूर : जवाहर महाविद्यालयातील मुद्रितशोधन कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर.
‘एआयच्या युगातही मुद्रितशोधनाचे महत्त्व कायम’
अणदूर : एआयच्या युगात मुद्रितशोधनाची प्रक्रिया सुलभ झाली असली तरी शुद्ध, अचूक आणि अर्थपूर्ण लेखनासाठी मुद्रितशोधनाचे महत्त्व कायम आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी केले. अणदूर (ता. तुळजापूर) येथील जवाहर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. आठ) मुद्रितशोधन कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धराम पाटील, पत्रकार विजय साळवे, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे व डॉ. अंकुश कदम उपस्थित होते. सिद्धराम पाटील यांनी मुद्रितशोधन क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती दिली. विजय साळवे यांनी ए.आय.चा वापर वाढला असला तरी मुद्रितशोधनाचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.