सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठेत शुकशुकाट
----
यंदा दुष्काळामुळे आर्थिक व्यवहारांवर झाला विपरित परिणाम, खरेदी-विक्री मंदावली
जळकोट, ता.८ (बातमीदार) : तालुक्यात पावसाअभावी यंदा खरिपाचे मोठे नुकसान झाले असून दुष्काळाच्या झळा बाजारपेठेतही बसत असून खरेदी-विक्री मंदावली असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात शेतीवर सर्व अर्थव्यवस्था अवलंबून असून अल्प पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचा थेट परिणाम शहर व ग्रामीण भागात बाजारपेठेवर जाणवत आहे. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे घटलेली क्रयशक्ती यामुळे ग्राहकांनी दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात लगाम लावल्याचे चित्र पाहिला मिळत आहे.
बाजारपेठेतील व्यवहारांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे ऑनलाइन खरेदीचेही वाढलेले प्रमाण, बदलती ग्राहकांची जीवनशैली, वाढते उत्पादन व वाहतूक खर्च आणि महागाई यामुळे पारंपरिक बाजारपेठेतील व्यावसायिकांपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यातच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम शहरी ग्रामीण भागातील बाजारपेठेतील व्यापारावर होताना दिसत आहे.
जळकोट शहराची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ग्राहकांवर अवलंबून आहे. तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांकडून होणारी खरेदी ही मंदावली आहे. अत्यावश्यक वस्तु वगळता इतर खरेदीवर काटकसर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
व्यावसायिकांना दुकानाचे भाडे, वीजबिल, नोकरांचे वेतन यांसह अन्य खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक बाजारपेठा टिकल्या तरच शहरातील आणि गावातील अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळणार आहे.
खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शेतीतून अपेक्षित पैसा हातात न आल्याने कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, बांधकाम साहित्य, हॉटेल व्यवसाय तसेच इतर अनेक वस्तूंच्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचीच खरेदी केली जात आहे.
सणासुदीच्या काळातही पूर्वीप्रमाणे उत्साहाने खरेदी करण्याऐवजी अनेक ग्राहक खर्चाचा विचार करून आवश्यक तेवढीच खरेदी करत असल्याचे चित्र आहे. महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडल्याने अनावश्यक खर्च टाळण्याकडे ग्राहकांचा अगोदरच कल वाढला आहे.
---
--