दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आजपासून राज्यस्तरीय मंथन
सामाजिक संस्था, तज्ज्ञांचा सहभाग; शाश्वत विकासाचा कृती आराखडा तयार करणार
कळंब, ता. २७ (बातमीदार) : महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासह ग्रामीण विकासाला शाश्वत दिशा देण्यासाठी कळंब येथे बुधवार (ता. २८) व गुरुवारी (ता. २९) दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र दुष्काळ निर्मूलन संकल्प २०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या पुढाकारातून होणाऱ्या या परिषदेत राज्यातील ५० हून अधिक सामाजिक संस्था, शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मानव विकास संस्थेचे अध्यक्ष हरी गिरी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक भागांत पाणीटंचाई, अनियमित पाऊस, शेतीचा वाढता खर्च, ग्रामीण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ही गंभीर आव्हाने कायम आहेत. दरवर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन नियोजन, प्रभावी जलव्यवस्थापन आणि लोकसहभागातून शाश्वत उपाय राबविण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकविकास मंचाचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांच्या पुढाकारातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेती, जलसंधारण आणि रोजगारावर भर
परिषदेत पाच एकरांपर्यंतच्या शेतीतून रोजगारनिर्मिती, प्रत्येक गावासाठी शाश्वत जलसंधारण, पशुधन व दुग्धव्यवसायाचा विकास, सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) प्रभावी वापर, तसेच मराठवाड्याच्या हक्काचे पाणी शेतीपर्यंत पोहोचविणे या विषयांवर चर्चा होणार आहे. शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावरही विचारमंथन केले जाणार आहे.
..................
((चौकट))
लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्याचा संकल्प
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, गावपातळीवर जलसंधारण, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापन या उपायांवर परिषदेत भर दिला जाणार आहे. सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांच्या अनुभवांची देवाणघेवाण करून दुष्काळ निर्मूलनासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या परिषदेत सामाजिक संस्था, शेतकरी प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हरी गिरी यांच्यासह ओमप्रकाश गिरी, एच. पी. देशमुख, भूमिपुत्र वाघ, शांता जैन, ज्ञानेश्वर पालकर, पंडित बामणकर आणि गर्वधन दराडे यांनी केले आहे.