जळकोट : पावसाअभावी उसाच्या पिकाची झालेली स्थिती.
पावसाच्या तुटीने उसावर बुरशी
जळकोट शहर,ता.५ : बारमाही पीक म्हणून ओळख असलेल्या उसाची हजारो शेतकऱ्यांनी सावकाराचे, बँकेचे कर्ज काढून, उधार उसनवार करून लागवड केली. वर्षभर पिकाचे संगोपन केले. मात्र जून आणि जुलै महिन्यात पावसाचा खंड तसेच भाग बदलत पाऊस पडल्याने उसावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभा ऊस खराब होताना दिसत आहे. पानांवर लोकरी मावा आणि काळी बुरशी पसरली आहे. जमिनीत हुमणी अळी आणि वाळवीने थैमान घातले आहे. त्यामुळे मुळापासून ऊस सडत आहे. अर्ध्यापासून ऊस सुकून पार वाळून चालला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला, यात उसाच्या पिकाचाही भरपाईसाठी समावेश करावा, उसावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. ऊस लागवड केलेल्या शेताचे देखील पंचनामे होऊन योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी धोंडिराम राठोड यांनी केली आहे.
-----
दुष्काळाचा मूग, उडिदाला फटका
जळकोट शहर,ता.५ : तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद यासह डाळवर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे वाढलेला कल आणि यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे मूग, उडिदाचे क्षेत्र आधीच घटलेले आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारपेठेत मूग, उडीद आणि तुरीची आवक कमी होण्याची शक्यता असून डाळींच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत. यंदा उशिरा झालेला खरिपातला पाऊस, पेरणीला झालेला विलंब आणि त्यानंतर पडलेला पावसाचा मोठा खंड यामुळे या पिकांची वाढ खुंटली आहे. आवश्यक त्या वेळी पाऊस न मिळाल्याने मुग, उडिदाचा फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत मूग आणि उडीद पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला.
----
जळकोट : माळहिप्परगा साठवण तलावातील जलसाठा.
दुष्काळात माळहिप्परगा तलावाचा आधार
--------
सध्या ९० टक्क्यांवर जलसाठा, पाण्याचा नियोजनबद्ध वापर आवश्यक
जळकोट शहर,ता.५ : तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने बहुतांश तलावातील जलसाठ्यात मोठी भर पडलेली नाही. अशा दुष्काळाच्या स्थितीत माळहिप्परगा तलावाचा परिसरातील ग्रामस्थांना मोठा आधार असेल. सध्या या तलावात ९० टक्क्यांवर जलसाठा आहे. त्यामुळे बेसुमार उपसा रोखण्यासह पाण्याचा नियोजनबद्ध वापर आवश्यक आहे.
जून महिन्यात तालुक्यात पडलेल्या पावसामुळे माळहिप्परगा साठवण तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे बाष्पीभवन वाढले, परिणामी सध्या माळहिप्परगा साठवण तलावात ९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान माळहिप्परगा साठवण तलावातून जळकोट शहर, माळहिप्परगा, रावणकोळा परिसराला पाणीपुरवठा केला जातो. जळकोट शहराची दहा हजार लोकसंख्या. माळहिप्परगाची पाच हजार तर रावणकोळाची तीन हजार अशी एकूण १८ हजार लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत माळहिप्परगा साठवण तलावाचा जलसाठ्याचा नियोजनबद्ध वापर झाल्यास या भागातील जनतेला पाणीटंचाई भासणार नाही. प्रशासनाने तलावातील अवैध पाणी उपसा पूर्णपणे रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने या तलावावर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस पडतो; मात्र यंदा ऑक्टोबरमध्येही पावसाने दडी मारल्याने विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. बोअरवेलचे पाणीही कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक आहे.
तीन तलावांत ९० टक्के साठा
तालुक्यात माळहिप्परगा, जंगमवाडी, हाळदावाढवणा तीन साठवण तलाव ९० टक्के भरले असले तरी बाकी दहा साठवण तलावात तीन ते चाळीस टक्के पाणी उपलब्ध असल्याने ८० टक्के गावांना यंदा आगामी काळात पाणीटंचाईची झळ सोसावे लागणार आहे.
जळकोट तालुक्यात तीन तलाव वगळता इतर ठिकाणी अत्यंत कमी जलसाठा आहे. त्यामुळे सर्वच तलावातील पाणी आरक्षित केलेले आहे. पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
-राजेश लांडगे, तहसीलदार, जळकोट
-----
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा
जळकोट शहर,ता.५ : जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने जळकोटसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्टोबर हा थंडीची चाहूल देणारा महिना मानला जातो; मात्र रविवारी दुपारी येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. वाढत्या उन्हामुळे शेतशिवारातील उरल्यासुरल्या पिकांनाही फटका बसत आहे. आधीच अनेक शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. हवामानातील सततच्या बदलांमुळे आता रब्बी पिकांचीही शाश्वती राहिलेली नाही.
----
कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची धावपळ
जळकोट शहर,ता.५ : शासनाने दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या पंचनाम्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मोठी धावपळ होत आहे. निसर्गाचा लहरीपणा, आर्थिक अडचणींना शेतकरी तोंड देत आहे. दुष्काळामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. तरीही परतीचा पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जून महिन्यापासून पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मका आणि कपाशीची पिके करपून गेली असून शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे.
-----