शेतकरी वंचित राहिल्याने याला जबाबदार कोण..? फुलंब्रीत अग्रीम मदतीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी..!

शेतकरी वंचित राहिल्याने याला जबाबदार कोण..? फुलंब्रीत अग्रीम मदतीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी..!
Published on: 
वावरातलं पिकलं नाही, पदरातलं टिकलं नाही - फुलंब्रीतील शेतकऱ्यांच्या व्यथा ः शासकीय पोर्टलच्या यादीतून नाव गायब फुलंब्री, ता. ८ (बातमीदार) : घरात होतं नव्हतं ते सगळं वावरात पेरलं, आभाळाकडे डोळे लावून पाऊस पडेल या आशेने कर्ज काढून खतं-बियाणं घातली; पण दुष्काळाने सगळंच हिरावून नेलं. पिके करपून राख झाली, संसाराचा गाडा कसा ओढायचा, हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. अशा मरणयातना भोगत असताना शासनाने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची अग्रिम मदत तरी पदरात पडेल आणि चूल पेटेल, ही शेवटची आशा होती; पण सरकारी पोर्टलच्या यादीतून आमचंच नाव गायब करून सरकारने आमच्या जखमेवर मीठ चोळलं आहे, अशा संतप्त भावना फुलंब्री तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील पाल, घर पाडळी, पेंडगाव आणि बिस्मिल्लाखाँवाडी या चार गावांतील शेतकऱ्यांवर सध्या आभाळच फाटले आहे. या गावांमधील शेतीचे १०० टक्के नुकसान झाले असतानाही केवळ राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर या गावांची नोंद नसल्याचे सांगत प्रशासनाने पडताळणीची प्रक्रियाच थांबवून ठेवली आहे. परिणामी, ऐन दिवाळीच्या सणातही या चार गावांतील हजारो शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहिली असून, त्यांच्या घरात सणाऐवजी घोर अंधार पसरला आहे. दुष्काळामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. सावकारांचे देणे, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च कसा चालवायचा, या चिंतेत शेतकरी होरपळत आहे. अशा बिकट स्थितीत शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीकडे शेतकरी डोळे लावून बसले होते. मात्र, महसूल प्रशासनाने पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करत हात वर केले आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतच नेहमी तांत्रिक अडचणी, ई-केवायसीचे फेरे आणि सर्व्हर डाउनचे बहाणे का पुढे येतात? शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीची यादी अपलोड करायला प्रशासन का कुचकामी ठरते, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रतिक्रिया पोटच्या पोरासारखं पीक जगवायचा प्रयत्न केला; पण पावसाअभावी डोळ्यांदेखत वावर जळून गेलं. घरात दाणा नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. सरकार ५ हजार रुपये देणार म्हणून रोज बँकेच्या आणि सेतू केंद्राच्या पायऱ्या झिजवल्या; पण आमचं गावच यादीत नाही म्हणतात. - पुष्पाबाई शिंदे, महिला शेतकरी, पाल ----- दिवाळीपूर्वी पैसे मिळतील या आशेवर किराणा उधारीवर आणला होता. आता सण गेला, पैसे आले नाहीत आणि उधारी फेडायला हातात दमडी नाही. शासनाने आमची नावे वगळून पाठीत खंजीर खुपसला आहे. तत्काळ मदत जमा झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर विष पिण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. - कारभारी गोल्हारे, शेतकरी, पाल -- प्रतिक्रिया प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर या चारही गावांची नावे एनआयसी पोर्टलवर समाविष्ट करावीत आणि कोणत्याही अटी-शर्तींशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम अनुदानाची रक्कम वर्ग करावी; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. - सचिन सुलताने, शेतकरी, पाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.