दुष्काळात चाऱ्याची काडी न् काडी मोलाची
नवजीवन गोशाळेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पशुधनासाठी दिल्या टिप्स
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ : दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शेतीसोबतच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा एकही कण वाया जाऊ न देता त्याचा अत्यंत शास्त्रीय आणि काटकसरीने वापर करणे काळाची गरज बनले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील नवजीवन गोशाळेला भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासकीय यंत्रणेसह गोशाळा व्यवस्थापनाला सतर्कतेचे आदेश दिले.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ चाऱ्याच्या साठ्याची गणना केली नाही, तर जनावरांचे आरोग्य, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन संगोपनाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेतला. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, टंचाईच्या काळात उपलब्ध होणारा कमी प्रतीचा किंवा निकृष्ट चारा थेट जनावरांपुढे टाकू नये. त्यावर योग्य प्रक्रिया करून, पूरक खाद्य आणि खनिज मिश्रणाचा वापर करूनच तो जनावरांना द्यावा. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टळेल आणि जनावरांना योग्य पोषण मिळून त्यांची पचनक्षमता सुधारेल. साठवणूक करताना चारा खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
नियमित आरोग्य तपासणी आवश्यक
दुष्काळात केवळ पोट भरणे पुरेसे नाही, तर साथीचे रोग पसरू नये म्हणून जनावरांचे आरोग्य टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित पशुवैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. गोशाळा परिसरात स्वच्छता ठेवणे आणि मुक्या प्राण्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.