सेवाभावी संस्थांना आवाहन

सेवाभावी संस्थांना आवाहन
Published on: 
दुष्काळ निवारणासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी पुजार; लोकसहभागातून मदतकार्याला बळ देण्यावर भर धाराशिव, ता. १० (बातमीदार) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केल्यास दुष्काळाच्या झळा कमी करता येतील. त्यामुळे जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, संघटना, उद्योग, बँका आणि नागरिकांनी दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, की दुष्काळामुळे शेती, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि ग्रामीण जनजीवनावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत केवळ शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता सामाजिक संस्थांनीही योगदान देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. बैठकीत बायफ संस्थेच्या प्रतिनिधींनी पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे, उपलब्ध चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग वाढविणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत चर्चा केली. महिलांना शेतीपूरक व्यवसायांसाठी साधनसामग्री देणे, दुष्काळग्रस्त कुटुंबांना उपजीविकेसाठी प्रशिक्षण देणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याच्या उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावपातळीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com