दुष्काळग्रस्ताना मदत देऊन
प्रभावी उपाययोजना राबवा
दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीची मागणी
--
लातूर, ता. ३ : राज्यातील आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मच्छिमार, कारागीर समूह महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत देऊन दुष्काळ निवारणासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना राबवव्यात, अशी मागणी दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे, डॉ. बी. आर. पाटील, कामगार संघटनेचे नेते राजकुमार होळीकर, ओबीसी भटके विमुक्त संघटनेचे राजेंद्र बनारसे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती ही केवळ पाणीटंचाई किंवा शेतीच्या नुकसानीपुरती नसून ग्रामीण जीवनावर आघात करणारी आहे. ही गंभीर, सामाजिक, आर्थिक मानवी आपत्ती आहे. पावसातील तूट, कोरडे पडलेले तलाव, आटलेल्या विहिरी, तलाव, बोरवेल, खरीप पिकांचे नुकसान, रब्बीची हमी नाही, कुणालाच रोजगार नाही. याचा विचार करून सरकारने तात्काळ सर्वाना आर्थिक मदत देऊन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
----