दुष्काळ आढावा बैठकित बोलू न दिल्याचा आरोप...

दुष्काळ आढावा बैठकित बोलू न दिल्याचा आरोप...
Published on: 
दुष्काळ आढावा बैठकीला गालबोट - बंब यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत कृष्णा डोणगावकरांचा सभात्याग गंगापूर, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता केवळ अधिकाऱ्यांकडूनच माहिती गोळा केली जात असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गुरुवारी (ता. पाच) बैठकीतून सभात्याग केला. आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत प्रमुख शासकीय विभागांची बैठक आयोजित केली होती. यात जनतेच्या प्रश्नांवरून आ. बंब व डोणगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत डोणगावकर यांनी प्रशासकीय नियोजनाचा पाढा वाचला. ते म्हणाले, ‘दुष्काळाच्या बैठकांचा कोणताही कृती अहवाल जनतेसमोर येत नाही. केवळ नव्या बैठका आणि आश्वासने दिली जातात. गंगापूर-वैजापूरसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वॉटर ग्रीड योजनेचे विहिरी व रायझिंग मेनचे काम रखडले आहे. दुष्काळाच्या काळात जायकवाडीचे पाणी साखर कारखान्याच्या उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. तसेच नांदूर मधमेश्वरचे आवर्तन केवळ नदीत न सोडता परिसरातील पाझर तलाव व बंधाऱ्यांमध्ये सोडून जलपुनर्भरण करावे.’ आमदारांनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून न घेता स्वतःची मते लादल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रतिक्रिया दुष्काळ हा राजकारणाचा नाही, तर सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. केवळ बैठका घेऊन दुष्काळ संपणार नाही. मागील निर्णयांचा हिशोब द्या, रखडलेली वॉटर ग्रीड पूर्ण करा आणि चारा-पाण्याचे ठोस नियोजन करा. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता दुष्काळावर मात करणे अशक्य आहे. - कृष्णा डोणगावकर, जिल्हा परिषद सदस्य ----- प्रतिक्रिया चारा आणि पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठीच ही प्रशासकीय बैठक होती. बैठकीत परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांकडूनच घ्यावा लागतो, लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडण्यासाठी ही बैठक नव्हती. आधीच्या बैठकीचा तपशील हवा असल्यास त्यांनी तो लेखी मागावा, पत्राद्वारे उत्तर दिले जाईल. चारा छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नसल्याने आरोपांमध्ये काही तथ्य नाही. -प्रशांत बंब, आमदार, गंगापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.