बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट. बळीराजा चिंतेत, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उत्साह कमी.

बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट. बळीराजा चिंतेत, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उत्साह कमी.
Published on
दुष्काळाच्या सावटाखाली यंदाचा बैलपोळा - खरिपाची पिके हातची गेल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत गंगापूर, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने ऐन बैलपोळा सणाच्या तोंडावर ग्रामीण भागावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. खरिपाचा हंगाम पूर्णतः वाया गेल्याने आणि रब्बी पेरण्यांची कोणतीही शाश्वती नसल्याने वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण साजरा तरी कसा करायचा, असा आक्रंदक सवाल शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी तालुक्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. विहिरी आणि नद्या कोरड्या पडल्या असून पिके डोळ्यांसमोर करपून जात आहेत. पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांमधील सणाचा उत्साह मावळला असून, त्याचा थेट फटका शनिवारी भरलेल्या आठवडे बाजाराला बसला. गोदावरी काठाचा मोजका पट्टा वगळता शिवना नदीसह संपूर्ण तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौकट ५० टक्के उलाढाल ठप्प पोळा तोंडावर असतानाही बाजारात मोरपीस, बाशिंग, घुंगरू, कासरे, रंग, आणि जोते आदी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली नाही. महागाईमुळे साहित्याचे दर वाढले असून, शेतकऱ्यांचे खिसे रिकामे असल्याने खरेदी निम्म्यावर आली आहे. प्रतिक्रिया पोळा अवघ्या दोन दिवसांवर आला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी खरेदीत हात आखडता घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केच साहित्याची विक्री झाली आहे. - ऋषिकेश कोऱ्हाळे, साहित्य विक्रेते प्रतिक्रिया पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील सणाचा आनंद हिरावला आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुष्काळी मदत, चारा आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करावी. - राहुल ढोले, शेतकरी कृती समिती प्रतिक्रिया वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतानाही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. - सूर्यकांत गरड, तालुकाध्यक्ष, काँग्रेस प्रतिक्रिया बैल हा केवळ प्राणी नसून आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. आज पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास गेला असून, गुरांच्या चाऱ्याची मोठी चिंता भेडसावत आहे. - अमोल तिखे, शेतकरी प्रतिक्रिया मशागतीचा १० टक्के खर्चही निघण्याची शक्यता उरलेली नाही. शासनाने तालुक्यात तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य आणि रब्बीसाठी मोफत बियाणे द्यावे. - वाल्मीक शिरसाट, शेतकरी नेते
Marathi News Esakal
www.esakal.com