रोहयोची कामे सुरू करा; ठिबकसाठी अर्ज स्वीकारा
-----
अशोक चव्हाण ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १२ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रे लिहिली आहेत. रोजगार हमीची कामे सुरू करावेत, ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज स्वीकारावेत, चारा-बियाणे उपलब्ध करून द्यावा आणि नागरी हद्दीतील शेतकऱ्यांना योजनांचे लाभ द्यावा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
दुष्काळामुळे शेतमजुरांचे शहरांकडे होणारे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, असे चव्हाण यांनी सुचवले आहे. जलसंधारण, नाला खोलीकरण, बंधारे, शेततळी आणि वृक्षलागवड यांसारखी कामे हाती घेऊन गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच मजुरांना वेळेवर मजुरी मिळण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
---
नागरी हद्दीतील २५ हजार शेतकऱ्यांचा प्रश्न
क वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील शेतकरी तांत्रिक कारणांमुळे कृषी, सिंचन आणि रोजगार हमी योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. नांदेड जिल्ह्यातील अशा क्षेत्रांतील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना बळिराजा शेत-पाणंद रस्ता, सिंचन विहीर, फळबाग लागवड आणि गोठा अनुदानासह विविध योजनांचे लाभ तातडीने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
----
चारा आणि सिंचनासाठी उपाययोजना
रब्बी पिके वाचवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन योजनांचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पूर्वसंमतीने निधी वितरित करण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. चारा टंचाईवर उपाय म्हणून पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चारा पिकांचे मोफत बियाणे द्यावे, उत्पादित चाऱ्याची शासनाने हमीभावाने पूर्वखरेदी करावी आणि दुष्काळग्रस्त भागांत चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.