पावसाअभावी फुलगळ झाली, शेंगाही करपल्या
सोयाबीन गेले, ईटा येथील शेतकरी दुष्काळाच्या छायेत
ईट, ता. १८ (बातमीदार) ः
ईट व परिसरातील सोयाबीन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेले असून राहिलेले वर्ष कसे भागवायचे, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.
ऑगस्टमध्ये शक्यतो झाडाला फुले लागून त्याचे रूपांतर वादी व नंतर शेंगाभरणीचा कालावधी असतो; परंतु नेमके ही प्रक्रिया चालू होण्याच्या वेळेसच पावसाने ४० ते ५० दिवसांची उघडीप दिल्यामुळे, आलेली फुलेही गळून गेली. राहिलेल्या फुलांचे रूपांतर शेंगात झाले. सध्या पिकाला वीस ते पंचवीस शेंगा दिसून येत आहेत. त्याही, पाणी वेळेवर न भेटल्यामुळे करपून गेल्या आहेत. सोयाबीनचा आकार हा ज्वारीपेक्षाही छोटा असल्यामुळे ते शेतातून बाहेर काढणे, खळे करून धान्य घरी आणणे परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
((कोट))
आमच्या दोघांचे मिळून पाच एकर सोयाबीन होते, ते पूर्णपणे करपून गेले. विहिरीला व बोअरला पाणी नाही. सोयाबीन शेतातून बाहेर काढणे खूप अवघड आहे. पेरणीचा खर्चही निघणार नाही. शासनाने पूर्ण पीक विमा व अनुदान लवकर देण्याची व्यवस्था करावी.
बालाजी आणि विक्रम हुबे, शेतकरी ईट.
-------------------
आमचे दोघांचे मिळून बारा एकर सोयाबीन आहे पाऊस नसल्यामुळे सर्व सोयाबीन करपून गेले. शासनाने पाहणी केली, पुढे काय? दुष्काळ जाहीर केव्हा होणार? शासन कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहे? पीक विमा लवकर मिळावा.
हनुमंत देशमुख, चेअरमन वि.वि.कार्यकारी सोसायटी, ईट