दुष्काळातही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली
आमदार कैलास पाटील आक्रमक, शून्य शुल्कावर अर्ज स्वीकारण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १२ ः राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली असतानाही, प्रत्यक्षात महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार कैलास पाटील यांनी थेट महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ही शुल्क वसुली तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
दुष्काळामुळे शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शुल्कमाफी जाहीर केली; मात्र महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी पाटील यांच्याकडे केल्या. यानंतर पाटील यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रशासनाशी चर्चा केली. महाडीबीटीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून घेण्याच्या सूचना असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, महाडीबीटीचे संकेतस्थळ २०२५ पासून बंद असून २०२६ मध्येही ते सुरू झालेले नाही, असा आक्षेप घेत आमदार पाटील यांनी या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळातही विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क अद्याप परत मिळाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
संपूर्ण प्रकाराबाबत आमदार पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांप्रमाणेच विद्यापीठांच्या परीक्षा अर्ज प्रणालीत सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांकडून अगोदर पैसे घेऊन नंतर परतावा देण्याऐवजी सुरवातीलाच शून्य शुल्कावर अर्ज स्वीकारावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर लवकरच तोडगा काढून विद्यार्थ्यांची सुरू असलेली लूट थांबवली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.