उसाची वाढ खुंटली; साखर कारखान्यांचे गाळप घटणार

उसाची वाढ खुंटली; साखर कारखान्यांचे गाळप घटणार
Published on: 
उसाची वाढ खुंटली; साखर कारखान्यांचे गाळप घटणार ------ प्रतिहेक्टरी ४० ते ४५ टक्के घट होण्याची चिन्हे; विभागात २३ कारखाने सुरू -- छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : दुष्काळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले असून, त्याचे सावट आता साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही पडणार आहे. लागवड क्षेत्रात मोठी घट नसतानाही पाण्याअभावी उसाची वाढ खुंटल्याने यंदा प्रतिहेक्टरी उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होईल, असा प्राथमिक अंदाज प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे. विभागात सध्या २३ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यंदाच्या गळीत हंगामात विभागातील कारखान्यांना पुरेसा उस मिळविण्याचे आव्हान उभे राहणार असून, गाळपाचा हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, धुळे जिल्ह्यातील एकमेव साखर कारखानाही बंद असल्याने तेथील ऊस उत्पादकांसमोर मर्यादित पर्याय आहेत. प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांत दरवर्षी सुमारे एक लाख ७१ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावर ऊसलागवड होते. त्यापैकी एक लाख ५९ हजार ४०२ हेक्टरवरील ऊस साखर कारखान्यांच्या गाळपासाठी उपलब्ध होतो. उर्वरित क्षेत्रावरील ऊस दुधाळ जनावरांच्या चाऱ्यासाठी विकला जातो. मागील गळीत हंगामात विभागातील कारखान्यांनी एक कोटी २२ लाख १३ हजार ९०८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकारी एस.एच. जेधे यांनी विभागात सध्या २९ पैकी २३ कारखाने सुरू असल्याचे सांगितले. ---- बीडमध्ये उसाची लागवड सर्वाधिक जिल्हानिहाय लागवड क्षेत्रात बीड जिल्हा ६३ हजार ५१० हेक्टरसह आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४० हजार ५०० हेक्टर, जालना जिल्ह्यात ३८ हजार ४७३ हेक्टर, नंदुरबारमध्ये १३ हजार ६२१ हेक्टर, तर जळगावमध्ये तीन हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. दुष्काळामुळे उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याबरोबरच कारखान्यांच्या गाळप नियोजनालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ---- छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये सर्वाधिक कारखाने बीडमध्ये दहापैकी नऊ, जालना पाचपैकी चार, छत्रपती संभाजीनगर दहापैकी आठ, तर धुळे एक आणि नंदूरबारमध्ये दोनपैकी एक असे एकूण २३ कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे, तर जळगावमध्ये एकच कारखाना असून तोही बंद आहे. त्यामुळे तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गाळपासाठी मर्यादित पर्याय आहेत. विशेष म्हणजे, दुष्काळी स्थितीमुळे यंदाचा ऊस काही प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यासाठीही शेतकऱ्यांकडून विकला जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.