गणवेशातील पोलिसाकडून मद्यप्राशन
-
व्हिडिओ व्हायरल; गैरवर्तनाची पोलिस अधीक्षकांकडून दखल
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १३ : गणवेशात मद्यप्राशन करून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एक पोलिस अधिकारी झोपलेल्या अवस्थेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस गणवेशाचा अवमान करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या बेशिस्त वर्तनाची पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी लातूर पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक गणपत गोपीनाथ पवार यांच्याविरुद्ध कठोर विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
गणपत पवार हे लातूर पोलिस मुख्यालय येथे नेमणुकीस असून, ३ नोव्हेंबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. दिवाळीनिमित्त ते पुणे येथे आपल्या कुटुंबीय व नातेवाइकांकडे गेले होते. या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गणवेशात मद्यप्राशन करून झोपलेल्या अवस्थेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. या व्हिडिओची माहिती नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली. संबंधित अंमलदाराने मद्यार्क सेवन केल्याची बाबही समोर आली आहे. याबाबतीत रेल्वे पोलिसांकडून अहवाल प्राप्त झालेला आहे.
पोलिस गणवेश हा केवळ पोशाख नसून तो कायद्याचे रक्षण, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. अशा गणवेशात मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणे ही पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला बाधा पोचवणारी गंभीर बाब आहे. प्रत्येक अधिकारी व अंमलदाराने आपल्या वर्तनातून पोलिस दलाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपणे अपेक्षित आहे, असे सांगून पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. संबंधित सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या बेशिस्त वर्तनाबाबत नियमानुसार कठोर विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
----------
((कोट))
लातूर पोलिस दलात शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य असून, गणवेशाचा अवमान करणारे किंवा पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही.
- अमोल तांबे, पोलिस अधीक्षक