दसऱ्याच्या मुहूर्तावर २५० कारची बुकिंग
बाजारपेठेत गर्दी : सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे कल
-----
लातूर, ता. १८ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसरा दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने लातूरच्या बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली आहे. दुष्काळाचे सावट आणि वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांकडून खर्चाचे नियोजन केले जात असले, तरी शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याचा उत्साह कायम आहे. रविवारी सुटीचा मुहूर्त साधत अनेकांनी कपडे, वाहने, सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली. जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर २५० हून अधिक कारची, तर शहरात अडीच हजारांहून अधिक दुचाकींची खरेदी होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
दसरा हा भारतीय संस्कृतीत शुभ दिवस मानला जातो. या मुहूर्तावर नवीन वाहन, सोने किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी वाढली असून, विविध कंपन्यांकडून आकर्षक सवलतीही दिल्या जात आहेत.
जया ह्युंदाईचे राहुल झुंजे म्हणाले, दसऱ्याच्या दिवशी वाहन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. यंदा दुष्काळजन्य परिस्थिती असली, तरी ठराविक ग्राहकांकडून वाहनांचे बुकिंग केले जात आहे. आमच्याकडे ४० हून अधिक कारचे बुकिंग झाले आहे. जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी २५० हून अधिक कारची खरेदी होईल, असा अंदाज आहे.
-----
दुचाकी खरेदीकडे कल
लातूर शहरात दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दुचाकी हे महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांकडून विचारणा आणि बुकिंग सुरू आहे.
अजिंक्य होंडाचे संचालक अजयसिंह राजपूत म्हणाले, दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे ६०० ते ७०० दुचाकींची विक्री होईल, असा अंदाज आहे. शहरात दसऱ्याच्या मुहूर्तावर अडीच हजारांहून अधिक दुचाकींची खरेदी होऊ शकते.
-----
पैठणी, डिझायनर साड्यांना पसंती
दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपड्यांच्या दुकानांतही गर्दी वाढली आहे. मात्र, दुष्काळामुळे ग्राहकांकडून गरजेनुसार आणि बजेटचा विचार करून खरेदी केली जात आहे. लहान मुलांसाठी अनारकली पोशाख, बाबा सूट, महिलांसाठी पैठणी आणि डिझायनर साड्या, तर पुरुषांसाठी मोदी जॅकेट आणि कुर्ता-पायजमा या पारंपरिक कपड्यांना पसंती मिळत आहे.
‘द्वारकादास श्यामकुमार’चे संचालक तुकाराम पाटील म्हणाले, दसरा-दिवाळीत कपड्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत आत्तापासूनच लगबग सुरू झाली आहे. यंदा दुष्काळामुळे ग्राहकांचा कल बजेटमध्ये राहून खरेदी करण्याकडे आहे. अवास्तव खरेदी होताना दिसत नाही. रविवारी सुटीमुळे अनेक ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले.
-----
कमी वजनाच्या दागिन्यांना मागणी
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये दसऱ्याच्या दिवशी दहा ग्रॅम सोन्याचा दर ५९ हजार ५७० रुपये होता. २०२४ मध्ये तो ७८ हजार ४६० रुपयांवर, तर २०२५ मध्ये एक लाख २१ हजार ५५४ रुपयांवर पोचला. यंदा सोन्याचा दर एक लाख ५२ हजार रुपयांवर गेल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या गणितावर परिणाम झाला आहे.
-----
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच दुष्काळामुळे अनेक जण आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवात खरेदीचा कल कमी होता. मात्र, दसरा शुभमुहूर्त असल्याने ग्राहक एक ते पाच ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यास पसंती देतील, असा अंदाज आहे. नोकरदार आणि मध्यमवर्गीय ग्राहकांकडून सध्या सोन्याच्या दराबाबत विचारणा होत आहे.
-कौस्तुभ ताथोडे, सराफा व्यापारी