दुष्काळाने मुंबई, पुण्याकडे स्थलांतर

दुष्काळाने मुंबई, पुण्याकडे स्थलांतर
Published on: 
दसरा होताच बेरोजगारांची मुंबई, पुण्याकडे धाव ------------ दुष्काळामुळे स्थलांतर, शेतकऱ्यांसह शेतमजुरांचा समावेश अधिक जळकोट,ता.२६(बातमीदार) : दसरा होताच रोजगाराच्या शोधात शेतकरी, शेतमजूर, मजूर आणि बेरोजगार युवकांनी महानगरांकडे स्थलांतरास सुरवात केली आहे. एसटी, ट्रॅव्हल्सने आता अनेकजण मुंबई, पुण्याकडे जाताना दिसत आहेत. दिवाळीनंतर या स्थलांतरामध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असून, शेतशिवारात कुठे सोयाबीनचा पालापाचोळा तर कुठे तुरीचा खराटा दिसत आहे. ज्वारी, कापूस, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न उरले नाही. परिणामी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्यांच्या घरात पैशांची आवक नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी घरदार सोडून परगावी जाण्याची वेळ आली आहे. दसरा सण संपताच तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थलांतराची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र अत्यल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आणि अनेक शेतांमध्ये उत्पादनाची आशाच संपुष्टात आली. ज्वारी, कापूस, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, तर शेतमजुरांना काम कसे मिळणार, शेतातील कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या हाताला रोजगार उरलेला नाही. दुसरीकडे, वाढत्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. अन्नधान्य, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि घरखर्च भागविताना कुटुंबांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत गावात राहून उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने अनेक कुटुंबांनी रोजगारासाठी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे. रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या नागरिकांची पुणे,मुंबई शहराला सर्वाधिक पसंती असल्याचे चित्र दिसत आहे. कामाच्या शोधात जाणाऱ्या नागरिकांमुळे खासगी प्रवासी वाहतुकीला मोठी गर्दी होत असून, दररोज खासगी ट्रॅव्हल्स भरून नागरिक पुण्याच्या दिशेने रवाना होत असल्याचे सांगितले जात आहे. कोणी बांधकाम करण्यासाठी, कोणी कंपनीत मजुरी करण्यासाठी तर कोणी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मजूर कुटुंबांना मुलाबाळांसह स्थलांतर करावे लागत आहे. गावातील घर आणि आपली माणसे मागे सोडून परक्या शहरात उदरनिर्वाहासाठी जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com