शस्त्रपूजन, वाहनपूजनाने उत्साह
धारासूरमर्दिनी मंदिरात विजयादशमीला दर्शनासाठी रीघ
धाराशिव, ता. २० (बातमीदार) : विजयादशमीचा सण शहरासह जिल्हाभरात मंगळवारी (ता. २०) साजरा करण्यात आला. घरोघरी शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि वह्यांचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सीमोल्लंघनानंतर एकमेकांना आपट्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील धारासूरमर्दिनी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती.
दसऱ्यानिमित्त सकाळपासूनच नागरिकांची सणाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांनी आपापली वाहने स्वच्छ केली. त्यानंतर झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे हार घालून वाहनांचे पूजन करण्यात आले. तसेच अनेक व्यावसायिकांनी मशिनरीचे पूजन केले. दुपारच्या सुमारास घरोघरी तसेच दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. वाहनांचे पूजन करण्यासोबतच वह्या आणि शस्त्रांचे पूजनही पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. दसऱ्याचा मुहूर्त साधत अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहने खरेदी केली. शोरूममधून नवीन वाहने घरी आणल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे विधिवत पूजन केले.
काही नागरिकांनी नवीन वाहनांचे पूजन केल्यानंतर धारासूरमर्दिनी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची ये-जा सुरू होती. सायंकाळच्या सुमारास दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. पारंपरिक पूजाविधी, नवीन वाहनांची खरेदी आणि देवीच्या दर्शनामुळे शहरात दसरा सणाचा उत्साह पाहायला मिळाला.