विकासाच्या चाकांमागे धुळीचे लोट; आता ‘डस्ट फ्री सिटी’चे हवे लक्ष्य!

विकासाच्या चाकांमागे धुळीचे लोट; आता ‘डस्ट फ्री सिटी’चे हवे लक्ष्य!
Published on: 
विकासाच्या चाकांमागे धुळीचे लोट --- हवे ‘डस्ट फ्री सिटी’चे लक्ष्य आणि यांत्रिक सफाईसोबत पक्के फुटपाथ --- उद्धव भा. काकडे ः सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः औद्योगिक विस्तार, वाढती वाहनसंख्या आणि बांधकामांच्या वेगामुळे शहराच्या विकासाला गती मिळत असतानाच, धुळीचे प्रदूषण नागरिकांसाठी गंभीर आव्हान बनले आहे. रस्त्यांवरील माती, उघडी जमीन, अपूर्ण फुटपाथ आणि वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे हवेतील धूलिकण वाढत आहेत. या समस्येवर केवळ रस्ते झाडून उपाय होणार नसून, धुळीचे मूळ स्रोत रोखण्याची गरज आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून शहराला ‘डस्ट फ्री सिटी’ बनविण्यासाठी महापालिकेने लोकसहभागातून नियोजन करणे गरजेचे आहे. स्वच्छ सर्वेक्षणात रँक सुधारलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेने रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी अलीकडे यांत्रिक सफाई यंत्रे (रोड स्वीपर मशीन) आणली आहेत. मात्र, प्रमुख रस्त्यांची नियमित सफाई, धूळ साचणाऱ्या ठिकाणांची निश्चिती आणि यंत्रांची पुरेशी उपलब्धता यावर भर देणे आवश्यक आहे. महापालिकेकडे सध्या १,७६० सफाई कर्मचारी असले, तरी प्रत्येक झोनमध्ये किमान दोन यांत्रिक सफाई यंत्रांची उपलब्धता असणे अपेक्षित आहे. रस्त्यांच्या स्वच्छतेसोबतच बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रण, राडारोड्याची योग्य विल्हेवाट, रस्त्यांच्या कडांची पक्की बांधणी आणि वृक्षलागवड यांची एकत्रित अंमलबजावणी आवश्यक आहे. यासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रस्ते विकासाशी संबंधित विभाग, औद्योगिक संघटना आणि बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असलेले स्वतंत्र ‘डस्ट फ्री सिटी मिशन’ राबविता येईल. यातून उपाययोजनांच्या प्रगतीचे नियमित मोजमाप करून हवेतील पीएम-१० व पीएम-२.५ या धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यावर भर देता येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. --- आराखड्यात हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता राज्य शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागासाठी डब्ल्यूआरआय इंडियाने तयार केलेल्या ‘छत्रपती संभाजीनगर हवामान कृती आराखडा २०२४’ मध्ये हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आराखड्यानुसार, २०१९ ते २०२२ या काळात पीएम-१० या धूलिकणांच्या वार्षिक सरासरी प्रमाणात ९७.३७ टक्के वाढ नोंदविण्यात आली. अजूनही हे प्रमाण कायम आहे. --- रस्ते केले; पण फुटपाथ नाही महापालिकेने मागील पाच-सहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्त्यांची कामे केली. यात बहुतांश प्रमुख रस्ते असून, काही अंतर्गत रस्त्यांचाही समावेश आहे. मात्र, यातील बहुतांश रस्त्यांवर अजूनही फुटपाथची कामे केलेली नाहीत. दुसरीकडे नवीन जलयोजना व पीएनजी गॅसलाइनसाठी जागोजागी रस्ते खोदले गेले आहेत, तेथेही दुरुस्ती व्यवस्थित झालेली नाही. गतवर्षी महापालिकेने रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पाडापाडीची मोठी मोहीम राबवली. हे रस्तेही निधीअभावी रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहेत. अशा भागांत वाहनधारकांची गैरसोय होत असून, धुळीची समस्याही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या कारणांमुळे अलीकडे धुळीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. --- या भागातील रस्त्यांकडे कायम दुर्लक्ष शहराभोवतीच्या हर्सूल, सुरेवाडी, जाधववाडी, आरतीनगर, ब्रिजवाडी, नारेगाव, पटेलनगर, मसनतपूर, चिकलठाणा, हीनानगर, राजनगर, मुकुंदनगर, संघर्षनगर, उस्मानपुरा, शहानूरमिया दर्गा, सातारा, देवळाई, रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, हमालवाडा, पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा अशा विविध भागांत नवीन वसाहती उभ्या राहिल्या आहेत. तेथील रस्ते अजूनही मुरूम-मातीचेच असून, त्याकडे अद्यापही पालिकेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने वगळता या भागातील नागरिक कायम धुळीने त्रस्त असतात. --- ((((कोट)))) शहरातील सर्व रस्त्यांची लांबी सुमारे १,४०० किलोमीटरच्या आसपास आहे. महापालिकेकडे सध्या १० छोट्या, तर ६ मोठ्या आकाराच्या रोड स्वीपर मशीन आहेत. मोठ्या सहा मशीनद्वारे रोज १५० किलोमीटरपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवरील धूळ शोषून घेतली जाते, तर छोट्या १० मशीनने १२० ते १५० किलोमीटरपर्यंतच्या अंतर्गत रस्त्यांवरची धूळ साफ केली जाती. अजून अशा १० मशीनची गरज आहे. - अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, महापालिका --- ((((कोट)))) शहराचा वेगाने होणारा औद्योगिक आणि पायाभूत विकास ही सकारात्मक बाब असली, तरी नागरिकांना रोज धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विकासासोबत पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. शहराला पुढील तीन वर्षांत धूळमुक्त शहर बनवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस उद्दिष्टे निश्चित करून कालबद्ध कृती आराखडा राबवावा. - रितेश मिश्रा, अध्यक्ष, सीएसएन फर्स्ट ---- आतापर्यंत महापालिकेची पावले -रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी १६ यांत्रिक सफाई यंत्रांची खरेदी. -शहर स्वच्छतेसाठी १,७६० सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता. -रस्त्यांवरील धूळ आणि कचरा हटवण्यासाठी नियमित स्वच्छता. --- ‘डस्ट फ्री सिटी’साठी नव्या उपाययोजना -यांत्रिक सफाई : प्रत्येक झोनमध्ये किमान दोन यंत्रे उपलब्ध करून प्रमुख रस्त्यांची नियमित सफाई करावी. -पक्के फुटपाथ : सलग, अडथळामुक्त पदपथ आणि रस्त्यांच्या कडांची पक्की बांधणी करावी. -बांधकामांवर नियंत्रण : साहित्य झाकणे, धूळ नियंत्रण यंत्रणा वापरणे, राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावणे. -खोदकामाला आळा : विविध सेवा पुरवठादारांत समन्वय साधून रस्त्यांवर सामायिक डक्टचे (कॅबल/डक्टिंग) नियोजन करावे. -हरित पट्टे : रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, दुभाजकांत हिरवाई आणि झाडांच्या जगण्याचे मोजमाप करावे. -हवेचे परीक्षण : पीएम-१० व पीएम-२.५ धूलिकणांचे मोजमाप करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. --- संस्थांनी सुचवलेला तीन वर्षांचा कृती आराखडा -पहिले वर्ष : धूळ निर्माण करणारे हॉटस्पॉट, उघडी माती, अपूर्ण फुटपाथ आणि बांधकामस्थळांचे सर्वेक्षण करून प्रमुख रस्त्यांवर नियमित यांत्रिक सफाई आणि नियमांची अंमलबजावणी करावी. -दुसरे वर्ष : पक्के रस्ते-शोल्डर, सलग फुटपाथ, पावसाळी निचरा, हरित पट्टे या पायाभूत सुविधांना गती देऊन बांधकाम डेब्रिज व्यवस्थापन करावे. -तिसरे वर्ष : सर्व प्रभागांत उपाययोजनांचा विस्तार करावा. हवेतील धूलिकण, रस्त्यांची स्वच्छता, बांधकामस्थळांवरील नियमपालन आणि वृक्षांच्या जगण्याचे मोजमाप करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com