ई-पीक पाहणीतील तांत्रिक

ई-पीक पाहणीतील तांत्रिक
Published on: 
ॲपमधील लोकेशनच्या घोळामुळे शेतकरी त्रस्त ---- जळकोट, ता. १७ (शहर बातमीदार) : ई-पीक पाहणी ॲपमधील लोकेशनच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी आणि कृषिमित्रांची गैरसोय होत असतानाच शासनाने ई-फेरफार प्रणालीद्वारे ग्राम महसूल अधिकारी स्तरावर पीक नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रखडलेल्या पीक नोंदणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची डिजिटल नोंदणी करण्यासाठी सुरू असलेल्या ई-पीक पाहणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. जळकोट तालुक्यात प्रत्यक्ष शेतात उभे राहूनही मोबाइल ॲपमध्ये संबंधित शेताचे अचूक लोकेशन दिसत नाही. अनेकदा दोन ते तीन शेतांपलीकडील लोकेशन दाखविले जात असल्याने पीक नोंदणीचे काम रखडत आहे. या समस्येची दखल घेत महसूल विभागाने सहा नोव्हेंबरला शासन निर्णय जारी करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल ॲपमध्ये तांत्रिक किंवा भौगोलिक अडचणींमुळे पीक नोंदणी शक्य होत नसलेल्या प्रकरणांमध्ये ग्राम महसूल अधिकारी स्तरावर ई-फेरफार प्रणालीद्वारे नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्यक्ष शेताच्या २० मीटर परिसरात उभे असतानाही गटाचे अंतर अधिक दाखविणे, गावांचे नकाशे बदलून दिसणे, काही गावांचे नकाशे उपलब्ध नसणे, तसेच गट क्रमांक आणि शेतकऱ्यांची नावे दिसत नसणे, अशा अडचणी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.