शाडू मातीच्या गणेशमूर्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण
गेवराई नगरपरिषदेच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गेवराई, ता. १२ (बातमीदार): पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश देत गेवराई नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती स्पर्धा २०२६’ मधील विजेत्या विद्यार्थ्यांना नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात आले. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सुंदर कलाकुसरीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर केला.
ही स्पर्धा शालेय स्तरावर प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आली. उत्कृष्ट मूर्ती साकारणाऱ्या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना समान स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. यात प्रथम क्रमांकासाठी सात हजार, द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये रोख, तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंतांचा गौरव करण्यात आला. प्राथमिक गटात सई स्वप्नील कोकाटे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर अथर्व अमोल आरबड (द्वितीय), सर्वेश सोमनाथ म्हेत्रे (तृतीय) आणि तन्वी दिनेश दीक्षित हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
माध्यमिक गटातून कार्तिक प्रकाश आतकरे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर प्रिशा संतोष त्रिवेदी (द्वितीय), वैष्णवी दत्तात्रेय लेंडगुळे (तृतीय) आणि श्रेया प्रदीप ठोंबरे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले. पारंपरिक उत्सव साजरा करत असतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील या जनजागृती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमास नगराध्यक्षा गीताभाभी पवार, उपनगराध्यक्षा रेवतीताई घुंबाडे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, स्वच्छता व पर्यावरण सभापती प्रशांत राख, रत्नमालाताई मोटे, शैलाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच नगरपरिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी राघव वावळे, दिनेश आवटे, शहर समन्वयक सुरेखा चव्हाण, प्रकाश रानमारे, दीपक साळवे आदी उपस्थित होते.