दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेशमूर्तींना पसंती
उमरग्यात मूर्ती अन् पूजेच्या साहित्यासाठी सजली बाजारपेठ, भाविकांची मोठी गर्दी
- -
उमरगा, ता. १३ (बातमीदार) : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस उरला असून, सोमवारी (ता. १४) होणाऱ्या श्रींच्या मूर्ती स्थापनेसाठी उमरगा शहरात रविवारी (ता. १३) खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पतंगे रोडच्या दुतर्फा दाखल झालेल्या नयनरम्य मूर्ती, विविध पूजा साहित्य आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या खरेदीने मुख्य बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली आहे.
तालुक्यातील एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अपंग, मतिमंद व अनाथ मुलांच्या बालगृहातील मुलांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. कल्पकता आणि कलागुणांना वाव देत विद्यार्थ्यांनी स्वतः अत्यंत सुबक व सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. २५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सातशे गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, बाजारपेठेत त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, ग्राहकांकडून त्यांना पसंती मिळत आहे.
बाजारपेठेत यंदा स्थानिक कारागिरांसोबतच कराळी, चिंचोली (भुयार), आष्टा कासार, धाराशिव तसेच कर्नाटकातील आळंद येथील कारागिरांनी घडवलेल्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. लहान आणि मध्यम आकाराच्या मूर्तींना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळताना दिसत आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तरीही खरेदीचा उत्साह कायम आहे. ग्रामीण भागातील बाल गणेश मंडळांसह शहर आणि परिसरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती आरक्षित करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, उत्सवाच्या आनंदासोबतच यंदा विविध गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनाचे विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला असून, स्थानिक प्रशासनाकडूनही या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.
उत्सवाच्या काळात सरींची आशा
यंदा तालुक्यात पावसाने महिनाभराचा खंड दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक आहे. मात्र, गणरायाच्या आगमनासोबतच उत्सवाच्या काळात तरी पावसाच्या सरी बरसतील आणि निसर्गाचे संकट दूर होईल, अशी आस शेतकरी बाळगून आहेत. या चिंतेतही उमरगेकरांनी गणेशोत्सवाची आपली परंपरा मोठ्या उत्साहात जपली आहे.
- - -
- -