गुटखाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
-------------
अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
गंगाखेड, ता. ६ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, साठवणूक, वाहतूक, विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यातील विविध शहरांत खुलेआम विक्री सुरू आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी संबंधित विभागांनी विशेष संयुक्त मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीतर्फे गुरुवारी (ता. पाच) करण्यात आली.
परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, परभणी, पूर्णा, गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ या शहरांत प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. पानटपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू असून, बसस्थानक, भाजीपाला बाजार, चौकाचौकांत अवैध साठवणूक व वाहतूक होत आहे. गुटख्याच्या व्यसनामुळे विद्यार्थी, तरुण पिढी व्यसनाधीन होत असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथक नेमून गुटखा विक्रीच्या ठिकाणी अचानक छापे टाकावेत. प्रतिबंधित गुटखा जप्त करून संबंधित विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. शाळा-महाविद्यालय परिसरातील दुकानांची विशेष तपासणी करावी. गुटखा बंदीबाबत जनजागृतीसाठी ठिकठिकाणी फलक लावावेत. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवून तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात कळवावा, असा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनावर अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा पदाधिकारी सोपानराव टोले, मधुकर मुळे, भगवान करंजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------