वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित
बहुजन कलावंत न्याय हक्क समिती करणार अधिकाऱ्यांचा उपराेधिक सत्कार
-----
लातूर, ता. २१ : जिल्ह्यातील २०२१ ते २०२४ या तीन वर्षांतील ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन याेजने’तील पात्र कलावंतांची आधार पडताळणी अद्याप प्रलंबित आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शेकडाे वृद्ध कलावंत गेल्या दाेन वर्षांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित असून, या प्रशासकीय संथ कारभाराचा निषेध करण्यासाठी ‘बहुजन कलावंत न्याय हक्क समिती’च्या वतीने ‘अधिकाऱ्यांचा उपराेधिक सत्कार’ हे आंदाेलन छेडण्यात येणार आहे.
समितीचे राज्य अध्यक्ष शाहीर सुभाष साबळे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील तीन वर्षांतील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधनास पात्र ठरलेल्या कलावंत प्रस्ताव धारकांचे कला सादरीकरण ७, ८ आणि ९ ऑक्टाेबर २०२४ राेजी घेण्यात आले हाेते. या सादरीकरणातून निवड झालेल्या पात्र कलावंतांची ‘महाकला सन्मान पाेर्टल’वर आधार पडताळणी करणे बंधनकारक हाेते. ही पडताळणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून सर्व पंचायत समित्यांच्या वतीने हाेणे गरजेचे हाेते; परंतु संबंधित विभागानी गेल्या दाेन वर्षांत ही आधार पडताळणी करून न घेतल्यामुळे, कलावंतांना अद्याप एक रुपयाही मानधन मिळालेले नाही. सादरीकरण हाेऊन आता दाेन वर्षांचा कालावधी पूर्ण हाेत आला आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच आम्ही हा उपराेधिक सत्कार साेहळा आयाेजित करत आहाेत, अशी प्रतिक्रिया शाहीर सुभाष साबळे, व्यंकट मुंडे, शाहीर रविकांत घाेगरे, शाहीर वामन हजारे, शाहीर उत्तम कांबळे, शाहीर बाबासाहेब कांबळे, कव्वाली गायक जनिमिया शेख, शाहीर काकासाहेब कांबळे, नागोराव महाराज गवळी, मुकुंद होदाडे, सुमनबाई कांबळे, सरूबाई कारगावे, सुरवसे प्रल्हाद, रुक्मिणी बाई लोंढे, सुधाकर सवई, शाहीर ज्ञानोबा कांबळे, शाहीर दगडू ढवळे, सोमनाथ परतवाड, शाहीर यादव परतवाड, गायिका अनिता कांबळे यांनी दिली. आंदाेलनानंतर तरी जिल्हा प्रशासन जागे हाेऊन तातडीने आधार पडताळणी पूर्ण करणार का, याकडे लक्ष लागले आहे.