वीज समस्येने सहा गावांतील शेतकरी त्रस्त
५ एमव्हीए उपकेंद्राचे काम रखडले; आंदोलनाचा इशारा
कळंब, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील बहुला, भोगजी, आडसुळवाडी, पिंपळगाव (को), आढाळा आणि आथर्डी या सहा गावांतील शेतकऱ्यांना मागील अनेक महिन्यांपासून वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. ५ एमव्हीए विद्युत उपकेंद्राचे काम प्रलंबित असल्याने कमी दाब, वारंवार वीज खंडित होणे आणि भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वारंवार मागणी करूनही महावितरणकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहाला महावितरण कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सहाही गावांतील शेतकऱ्यांनी महावितरणचे उपअभियंता जयंत लडे यांना निवेदन दिले आहे. बहुला ग्रामपंचायतीने ११ सप्टेंबरला महावितरणकडे निवेदन देऊन ५ एमव्हीए विद्युत उपकेंद्राचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, भोगजी उपकेंद्रांतर्गत दोन लिंक लाइनचे काम मंजूर झाले आहे. संबंधित गुत्तेदाराने सिमेंटचे पोल उभे केले; मात्र जवळपास सहा महिन्यांपासून पुढील काम अपूर्ण आहे. आवश्यक साहित्य महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही.
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर असताना वीज समस्येमुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. पिकांना पाणी देणे, मोटारी चालवणे आणि शेतीची कामे करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे प्रलंबित विद्युत कामे तातडीने पूर्ण करून सहाही गावांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.