वीजचोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम
----
हिंगोली, ता. १५ : महावितरणच्या नांदेड परिमंडलात अनधिकृत वीजवापराविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील हांडी येथे पाच जण वीजचोरी करताना आढळून आले. याप्रकरणी महावितरणच्या तक्रारीवरून संबंधित पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
हांडी येथील गोविंद लिंबाजी डोईफोडे, अनिल कडू राठोड, केशव दगडू डोईफोडे, बबन विठ्ठल राठोड आणि शामराव आनंदराव घुगे यांनी महावितरणच्या लघुदाब वीजवाहिनीवर केबलच्या साहाय्याने आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. महावितरणच्या वीजचोरी शोध पथकाने केलेल्या तपासणीनंतर संबंधित प्रत्येकाला वीजवापराची रक्कम आणि दंड मिळून प्रत्येकी ५ हजार ५९८ रुपये भरण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत ही रक्कम भरली नसल्याने महावितरणने कायदेशीर कारवाई केली. महावितरणच्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता. १३ ऑक्टोबर) भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ नुसार पाचही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
---
जोडणी घेऊन वीज वापरा
महावितरणच्या नांदेड परिमंडलात नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या संपूर्ण परिमंडलातील शहरी आणि ग्रामीण भागांत अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. वीजवाहिन्यांवर आकडे टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल, शेगड्या आणि हीटर जप्त करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी रोखण्यासाठी नागरिकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापरावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.