दीपोत्सव लेख परभणी फोटोसह
PRB26B66983
---
वृद्धत्व की ज्येष्ठत्व
- ज्येष्ठत्व वय वाढण्यातून नाही, तर अवघ्या आयुष्यातील समृद्ध अनुभवातून येतं! शहाणपण, स्वानुभव, सहजता, संयम, विवेक म्हणजे ज्येष्ठत्व! घेतलेल्या अनुभवाचा उपयोग इतरांना व्हायला हवा! आपल्या अनुभवांनी दुसऱ्याच्या वाटेवरचा प्रकाश होणं, यातच ज्येष्ठत्वाची इतिकर्तव्यता! आपल्या कृतीने आपल्या भोवतालच्या लोकांचे आयुष्य अधिक आनंदी होईल आणि आपण इतरांना अधिकाधिक प्रिय होत जाऊ, अशी वृत्ती म्हणजे ज्येष्ठत्व!
- सुवर्णा व्यंकट मुळजकर, परभणी
---
‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे वर्षभरात जसा पावसाळा अटळ तसे प्रत्येक व्यक्तीला वृद्धत्व अटळ असतंच! काही अपवाद वगळता बाकी प्रत्येकाला वृद्धत्वाला सामोरं जावंच लागतं. जन्म, मरण हे काही चुकत नाही. परंतु, वय वाढले की पहिली अडचण येते ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याची! ‘दंताजीचे उठले ठाणे, फुटले दोन्ही कान नन्ना म्हणते मान’ अशी अवस्था! वृद्धत्व बहुधा सोबत घेऊन येते आजारपण, एकटेपणा, नैराश्य, दुर्बलता. औषधांच्या गोळ्या आणि दवाखान्याच्या वाऱ्य; परंतु या अडचणींवर धैर्याने मात करता येते. त्यासाठी हवी जिद्द आणि जबरदस्त इच्छा! आवडीच्या गोष्टी करण्यात खरोखर सुख मिळत असते, ही गोष्ट प्रथम ध्यानी घेतली पाहिजे. योगा, हास्य संघ, ज्येष्ठ नागरिक संघ यात सहभागी होण्याने बरंच मानसिक स्थैर्य आणि आरोग्य प्राप्त करता येऊ शकते. समवयस्कांमध्ये राहण्याने आपले वाढलेल्या वयाचे प्रश्न सौम्य होऊन ज्येष्ठत्व नक्कीच खुलते, फुलते, विकसित होते. वाढत्या वयासोबत अधिकाधिक अनुभवसंपन्न होत जाणं, दुसऱ्यांना अधिकाधिक हवेहवेसे वाटू लागणं, ही ज्येष्ठत्वाची लक्षणं! मावळता सूर्यसुद्धा जाता-जाता सोनेरी किरणांना मागे ठेवून जातो. रात्रीच्या अंधारगर्भ सौंदर्याला अस्तित्व देऊन जातो. असं मनामनात आपलं अस्तित्व निर्माण करून कायम उरणं म्हणजेच ज्येष्ठत्व! कितीही नको म्हटले, तरीही काळ थांबत नाही आणि वय वाढायचेही थांबत नाही. उतरत्या वयाच्या या टप्प्यावर वळून पाहता हेच कळले आहे, की आयुष्य एखाद्या खळखळत वाहणाऱ्या नदीप्रमाणे खाचखळग्यांची, दगडगोट्यांची तमा न बाळगता पुढे पुढे झेपावत राहते. सगळा पूर्वार्ध दमछाक होण्यातच जातो. मधला काळ तर स्वतःला सिद्ध करण्यासाठीच असतो जणू! या काळात वडिलधाऱ्यांशी, समवयस्कांशी आणि लहानांशी त्या-त्या नात्यांच्या परिप्रेक्ष्यात रीतसर, योग्य तसे वागण्याची कसरत खेळावी लागते. याच काळात स्वतः मिळवलेले ज्ञान, संस्कार, कष्ट करण्याची सवय आजमावण्याची कठीण परीक्षा असते; शिवाय मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी असतेच. त्यासोबतच अर्थार्जन-अर्थनियोजन-भविष्यासाठी अर्थसंग्रह या गोष्टींचेही महत्त्व असतेच! ही तारेवरची कसरत करता करता तारुण्य कधी बोट सोडून निघून जाते कळतही नाही. प्रत्येकाला माझ्या मते कमी-अधिक प्रमाणात हाच अनुभव येत असणार! बालपण, किशोरावस्था, युवावस्था, प्रौढत्व, शेवटी ज्येष्ठत्व या जगण्याच्या सगळ्याच पायऱ्या खरं म्हणजे खूप सुंदर असतात! त्यातीलच शेवटचा टप्पा म्हणजे ज्येष्ठत्व! प्रत्येक टप्प्यातील सौंदर्य आठवत विचारपूर्वक ज्येष्ठत्व जपणं, फुलवणं आणि मनापासून ते उपभोगणं हे या टप्प्यावर जमायला हवं! तसं फारसं कठीणही नाही, तशी मनापासून इच्छा मात्र हवी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आतलं लहान मूल जपून ठेवता आलं पाहिजे. त्या लहान मुलाला साक्षी भावाने पाहता आलं पाहिजे. लहान-लहान गोष्टींतील सौंदर्य निरागसपणे टिपता आलं पाहिजे! घडणाऱ्या घटनांना संवेदनशीलतेने अनुभवता आलं पाहिजे! ते आपल्या आतलं लहान मूल मग आपल्याला सतत टवटवीत, कार्यमग्न ठेवत राहील. आताशी वारंवार वाटू लागलंय, की आलेलं वृद्धत्व ज्येष्ठत्व म्हणून मिरविता आले पाहिजे यात खरी मजा आहे! वृद्धत्वाचा अर्थच मुळी वयाचा आकडा नि प्रकृतीशी निगडित असतो आणि ज्येष्ठत्वाचा संबंध, तो असतो अनुभव, कर्तेपण, स्वभावातील सहजता आणि योग्य ते मार्गदर्शन करण्याची क्षमता या सर्वांशी! आहे की नाही गंमत! मग आलेल्या किंवा येऊ घातलेल्या त्या वृद्धत्वाकडे न पाहता या ज्येष्ठत्वाची उबदार शाल पांघरून आनंदात रहायला काय हरकत आहे? खळखळत सुरू झालेल्या नदीच्या प्रवाहाचा जसा शेवटी समुद्रात मिळताना मुखाशीच सारा आवेग थंडावून जातो तसाच हा काळ! समुद्र सामावून घेईतो जरा सबुरी धरावी लागते, तिथून परतही फिरता येत नाही, पूर्वीच्या वेगाने पुढेही जाता येत नाही. ही आयुष्याच्या उत्तरार्धात समोर ठाकणारी अपरिहार्य परिस्थिती!! परंतु या परिस्थितीसमोर हात टेकवत नाही ते ज्येष्ठत्व! कारण, ते धडपडू पाहतं कणखर राहण्यासाठी! तारुण्यात राहून गेलेल्या गोष्टींचा एकदा तरी पुन्हा परामर्श घ्यावा, एखादी अभिव्यक्त होऊ न शकलेली कला सर्वांसमोर आणावी, एखादं धाडस निर्भीडपणे करूनच निघावं असं त्याला खूप वाटतं. पण, लगेचच आपल्या क्षमतांची लांबी-रुंदी आखूड वाटायला लागते, तर कधी वयाचे सत्य, आयुष्य उतरणीला लागल्याचे, उत्तरार्धात पोचल्याचे सत्य, आपल्या कटूत्वाचे हलाहल घेऊन समोर उभे राहते. ‘जाऊ दे यार’ म्हणत पुढे जाणे यातच खरे शहाणपण! याच काळात मग आपले छंद पुनरुज्जीवित करणे, त्यात नावीन्य आणत चालू काळाशी आणि स्वतःच्या क्षमतांशी सुसंगत असा नवा दिनक्रम बनविणे, आवडीची गाणी ऐकणे या गोष्टी मुद्दाम कराव्यात. यातच खरा आनंद दडलेला आहे. आवडीची गाणी ऐकणे वाचायची राहून गेलेली पुस्तके वाचणे, नातवंडांशी मैत्री करणे यातून वयाच्या अनुषंगाने आलेले जडत्व हलकेफुलके करता येईल. चला तर मग आयुष्याचा हा घनगंभीर उत्तरार्ध थोडा रंगीत, थोडा सुरेल, थोडा सुरेख, थोडा सुंदर, थोडा चंचल, थोडा अवखळ करूया! जे मनात आणलं ते सत्यात उतरवावं हाही एक आनंदच! प्रयत्नांचा मोक्ष हा आनंदमयीच व्हावा हाच खरा उत्तरार्ध!! यातच खरे ज्येष्ठत्व.
-------------