((तीन अँकर))
..............
५९ हजारावर कुटुंबांच्या हाताला मिळाले काम
२७ हजार ३६९ विकासकामे प्रगतिपथावर; १०५.६१ टक्के उद्दिष्टपूर्ती
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ ः ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ अंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच २४ लाख ५६ हजार मनुष्यदिवसांची निर्मिती करत १०५.६१ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. या माध्यमातून हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
जिल्ह्यात एकूण ३ लाख ७१ हजार ४७७ कुटुंबांची जॉबकार्ड नोंदणी झाली असून, २०२५-२६ मध्ये ४९ हजार ७०६ नवीन कुटुंबांची नोंदणी करून त्यांना जॉबकार्डचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार १९८ कुटुंबांना प्रत्यक्ष काम मिळाले असून, त्यापैकी ४ हजार ९४२ कुटुंबांनी १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस काम पूर्ण केले आहे.
२७ हजारांहून अधिक कामे सुरू
गावांमध्ये टिकाऊ मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जात असून सध्या जिल्ह्यात २७ हजार ३६९ विकासकामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये तब्बल १४५ कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये अकुशल कामांवर ७२ कोटी ९४ लाख रुपये, तर कुशल कामांवर ७१ कोटी २४ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
........
((चौकट))
आता १२५ दिवस रोजगाराची हमी
विकसित भारत आजीविका अभियानांतर्गत कामांची व्याप्ती वाढवून ३१८ प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मजुरांना आता वर्षाला १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली आहे.