ABD26J83359
हिंगोली : विवेक गायकवाड यांचा सत्कार करताना महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व अधिकारी.
महिलांनी नवनवीन व्यवसाय सुरू करावेत
-
दाटेगाव एक कोटीचे बक्षीस; महिला बचत गटांकडून गायकवाड यांचा सत्कार
हिंगोली, ता. १८ ः महिलांनी केवळ बचत आणि अंतर्गत आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता नवनवीन उद्योग-व्यवसाय सुरू करावेत. स्वतःची स्वतंत्र उद्योजकीय ओळख निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक मिळवत तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकाविले आहे. या यशात मोलाचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल दाटेगाव येथील महिला बचत गटांच्या वतीने बुधवारी (ता. १८) मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांचा जिल्हा परिषदेत नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गायकवाड म्हणाले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक समज आणि संघटन कौशल्य निर्माण झाले आहे. आता पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन काळानुरूप नव्या उद्योग क्षेत्रांत संधी शोधण्याची गरज आहे. महिलांच्या उद्योग उपक्रमांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक डॉ. नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, समृद्धी दिवाने, गटविकास अधिकारी माया वानखेडे, विष्णू भोजे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी स्मिता कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दाटेगाव परिसरातील वीस बचत गटांमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.