‘वाहनचालकांनाही समान काम
अन् समान वेतन लागू करा’
---
नांदेड, ता. १३ : उच्च न्यायालयातील वाहनचालकांप्रमाणे जिल्हा परिषद तसेच शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका वाहनचालकांनाही समान काम, समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथेही याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
वाहनचालकांच्या या मागणीची मुख्यमंत्र्यांकडे सकारात्मक शिफारस करून निवेदन पुढे पाठवावे, अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक शिफारस करून निवेदन पुढे पाठविण्याचे आश्वासन दिले. वाहनचालकांच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे ही मागणी मांडली असून, निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजय राऊत, कोषाध्यक्ष शेख अहेमद, शासकीय महसूल वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाठोरे, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे सतीश चिंतल, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका वाहन चालक संघटनेचे नंदकुमार लंगडे, एस. बी. जाधव, पवार, जावेद बेग यांच्यासह वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.