१९ हजार उत्तरपत्रिकांची अनधिकृत तपासणी
- लासूर स्टेशनच्या छत्रपती शाहू महाविद्यालयातील प्रकार
- प्राचार्यांसह ४८ जणांवर शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा नोंद
- बायोमेट्रिक, बनावट आयडीद्वारे पावणेतीन लाखांचा अपहार
लासूर स्टेशन, (ता. गंगापूर) ता. १६ (बातमीदार) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (नाशिक) तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिका संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या व अनधिकृत शिक्षकांकडून तपासून घेत विद्यापीठासह विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा मूल्यमापन केंद्रावर हा प्रकार घडला. यासह विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार रुपयांचे मानधन लाटल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस स्थानकात महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप सेंटर संचालकांसह एकूण ४८ जणांविरुद्ध रविवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
याप्रकरणी मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट ३ व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व गैरप्रकार गतवर्षी २०२५ मध्ये ९ जून ते ४ जुलै या कालावधीत घडला. विद्यापीठाने छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर काही अधिकृत प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संशयित आरोपींनी आपापसांत संगनमत करून अधिकृत प्राध्यापकांचा केवळ बायोमेट्रिक अंगठा (थंब इम्प्रेशन) घेतला आणि उत्तरपत्रिका तपासण्याची ऑनलाइन लिंक व साइट उघडली. प्रत्यक्षात अधिकृत प्राध्यापक केंद्रावर उपस्थित नसतानाही, तेच पेपर तपासत असल्याचा भास निर्माण करणारे बनावट आयडी तयार करण्यात आले. या माध्यमातून ज्यांना संबंधित विषयाचे ज्ञान नाही आणि जे विद्यापीठाकडून अधिकृत नाहीत, अशा दुय्यम व अनधिकृत शिक्षकांकडून तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासून घेण्यात आल्या. यासाठी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन उकळण्यात आले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देऊन उर्वरित रकमेचा अपहार करत विद्यापीठाच्या नियमांचे व कायद्याचे गंभीर उल्लंघन करण्यात आले आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांत कलम १९८, ३१८(४), ३१९(२), ३३६(२), १९९, ३(५), ६१(२), १० आणि ३४०(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत.
चौकट
गुन्हा नोंद झालेल्यांची नावे
प्रा. डॉ. मधुकर साठे (कॅप सेंटर संचालक), प्राचार्य डॉ. संदीप राजाभाऊ धिरडे, दादासाहेब कऱ्हाळे (तांत्रिक सहाय्यक), अंकुश गंगाराम पडाळे, प्रा. विशाल अशोकराव चपटे, ज्योती भरतराव चव्हाण, डॉ. ए. एन. मस्के, डॉ. अविनाश अंकुशराव भीमराव , विश्वनाथ कोंडिबा बोबडे, डॉ. डी. एम. पंडिलवाड, डॉ. एच. एस. सातपुते, डॉ. रितांजली श्रीराम जाधव, डॉ. एन. जी. साळुंके, डॉ. पी. आर. मिसाळ, डॉ. एस. डी. वागवे, डॉ. एल. एस. दुग्गमवार, डॉ. व्ही. के. चव्हाण, डॉ. व्ही. एन. बागुल, डॉ. व्ही. एस. फुलारी, डॉ. वाय. ए. पाटील, डॉ. राजाभाऊ नारायणराव करपे, डॉ. एस. बी. सोलापुरे, दत्ता जनार्दन येरमुले, अशोक नागनाथ गायके, वसंतकुमार गणपत माळी, प्रा. बाळासाहेब वसंतराव राठोड, राजीव बबनराव मोहिते, निर्मला नारायण सिरसाठ, राजेश्वर माणिकराव विभुते, प्रा. कृष्णा काशिनाथ गवळी, कोवरी श्रीमंतराव थोरे, डॉ. एस. बी. मनल, डॉ. आर. एस. पांचाळ, ऋषिकेश दिलीप बनकर, जितेंद्र चव्हाण, पंडित चव्हाण, ज्ञानेश्वर धोत्रे, पी. एम. तुपे, प्रा. श्रुती सुधाकर चव्हाण, डॉ. बी. व्ही. वाहटुळे, डॉ. आर. एम. सरवदे, वंदना यादवराव कांबळे, प्रा. प्रमोद उत्तमराव भास्कर, गोकुळ राजेंद्र पवार, सुयोग चव्हाण, रामेश्वर तुळशीराम करपे, जयंत माणिकराव पठाडे, डॉ. संतोष जगन्नाथ जाधव.