मृत पत्नीला सोडून पती पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत पत्नीला सोडून पती पसार
मृत पत्नीला सोडून पती पसार

मृत पत्नीला सोडून पती पसार

औरंगाबाद : रस्त्यात चक्कर येऊन पडल्याने जखमी पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू करण्यापुर्वीच पतीने बुधवारी (ता. तेरा) रुग्णवाहिका आणण्याचा बहाणा करुन धूम ठोकली. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांच्या प्रतिक्षेत शवागारात पडून होता. अखेर शनिवारी (ता. सोळा) नाईलाजास्तव पोलिसांनी विवाहितेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. अजूनही या विवाहितेच्या नातेवाईकांचा पोलिसांना शोध लागलेला नाही.

संगीता संदीप जैस्वाल (वय ३५, रा. मुकुंदवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. संगीता हिला पहिल्या पतीपासून चार मुले आहेत. गेल्या बारा वर्षांपुर्वी तीने संदीप जैस्वाल याच्यासोबत दुसरा विवाह केला. ११ एप्रिल रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास संगीता सिडकोतील कॅनॉट गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एसबीआय बँके जवळ अचानक चक्कर येऊन पडली. दगडावर डोके आदळल्याने तिच्या डोक्याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या. तिला पती संदीप हिरालाल जैस्वाल व तीची मैत्रीण मंदा मिसाळ यांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले. घाटीतील ट्रॉमा केअर वॉर्डात उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. बारा) सकाळी साडेनऊच्या सुमारास तीचा मृत्यू झाला.

मृत्यूबाबतची एमएलसी प्राप्त होताच सिडको पोलिस बुधवारी शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल झाले. शवविच्छेदनाच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून पती संदीप जैस्वाल सिडको पोलिसांना रुग्णवाहिका घेऊन येतो म्हणत पसार झाला. बराचवेळ होऊनही संदीप जैस्वाल येत नसल्याचे पाहून पोलिसांनी घाटी परिसर व मुकुंदवाडी भागात शोध घेतला. मात्र, तो शोध लागला नाही. तसेच त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने पोलिसांची पंचायत झाली.

अखेर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह घाटीतील शीतगृहात ठेवला आहे. या प्रकरणाची सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संगीताच्या नातेवाईकांनी सिडको पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

विखुरलेले कुटुंब

संदीप जैस्वाल हा संगीताचा दुसरा पती आहे. पहिल्या पतीपासून संगीताला चार मुले आहेत. ही चारही मुले हडको, एन-१२ येथील एका वसतीगृहात आहेत. तर जैस्वालपासून तीला एक मुलगा आहे. संगीता गेल्या १२ वर्षांपासून संदीपसोबत मुकुंदवाडी भागात वास्तव्यास होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Web Title: Excuse To Bring An Ambulance Husband Leave Dead Wife Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top