नाती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी
डॉ. वाकोडकर ः ‘जपूयात नाती कुटुंबाची’ कार्यशाळा उत्साहात
औरंगपुरा, ता. १३ ः कौटुंबिक नाती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी केले. स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जपूयात नाती कुटुंबाची’ या कार्यशाळेत ते बोलत होते.
गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष दीपक पांडे होते. संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, संयोजक तथा उपप्राचार्य डॉ. संदीप चौधरी उपस्थित होते. यावेळी डॉ. वाकोडकर म्हणाले, की भारतीय कुटुंबपद्धती ही जगासाठी आदर्श असून प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून नाती टिकविण्याची परंपरा भारतात आहे. कुटुंबातील नाती जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. डॉ. श्रीरंग देशपांडे म्हणाले, की अपेक्षा बाजूला ठेवल्यास आनंद शिल्लक राहतो. अहंकार आणि अवास्तव अपेक्षांमुळे कुटुंबात बेबनाव निर्माण होतो. डॉ. विवेक मिरगणे यांनी बदलत्या कुटुंबव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. अमृता वाकळे, पाहुण्यांचा परिचय डॉ. शुद्धोधन राऊत यांनी केला. आभार डॉ. संदीप चौधरी यांनी मानले. या वेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.