((अँकर))
---
एक लाख शेतकऱ्यांना ८६१ कोटींची कर्जमाफी
-----
तीन याद्यांत एक लाख ९७ हजार शेतकरी पात्र; १,८४० तक्रारींपैकी १,६६६ निकाली
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एक लाख दोन हजार २१८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ८६१ कोटी ५६ लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार ९१२ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी एक लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे.
शासनाने दोन जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार ही योजना लागू केली आहे. एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले असल्यास, पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना लागू आहे. या योजनेत दोन लाख रुपयांवरील थकबाकी ३१ मार्च २०२७ पूर्वी भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, ठरावीक वर्षांत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
---
तीन याद्या जाहीर; तक्रारींचे निवारण सुरू
जिल्ह्यातील बँकांनी पोर्टलवर दोन लाख २४ हजार ८४७ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यानंतर संगणकीय प्रक्रियेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. पहिली यादी २५ जुलै, दुसरी ११ सप्टेंबर, तर तिसरी यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली. पुढील याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत. जिल्ह्यातील तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा एकूण एक हजार ८४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एक हजार ६६६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. यादीत नाव नसलेल्या किंवा लाभाबाबत शंका असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक, तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समिती किंवा तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
---
जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सहायक निबंधक (प्रशासन) ए.डी. भागानगरे हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेबाबतच्या तक्रारींसाठी ९२८४३५०७३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
---
बोरगाव तेलंग येथील शेतकऱ्याच्या कर्जाबाबत स्पष्टीकरण
बोरगाव तेलंग येथील शेतकरी शंकर अबानराव क्षीरसागर यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. याबाबत प्रशासनाने संबंधित कर्जाची माहिती स्पष्ट केली आहे. क्षीरसागर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वजिराबाद शाखेतून २६ सप्टेंबर २०२३ रोजी एक लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परतफेड न झाल्याने ३१ मार्च २०२६ अखेर त्यांच्या कर्जखात्यावर दोन लाख आठ हजार १०४ रुपये थकबाकी होती. बँकेने संबंधित कर्जाची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली असून, हे कर्ज एकरकमी परतफेड योजनेसाठी पात्र असल्याचे कळविले आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांवरील थकबाकी भरल्यानंतर नियमानुसार दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. संबंधित शेतकऱ्याने यादीत नाव नसल्याबाबत तालुका उपनिबंधक कार्यालयात तक्रार केल्याची नोंद नसल्याचे, तसेच बँकेशी संपर्क साधला नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी कळविल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
---
लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध
योजनेबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे यादीत नाव नसल्यास घाबरून जाऊ नये आणि कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
---