‘थकबाकीमुळे वीजजोडणी तोडू नका’
-----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २३ : शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज सलग आठ तास अखंडित वीजपुरवठा करावा, वीजबिल थकबाकीच्या कारणावरून वीजजोडणी तोडू नये, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. रूई फिडरवरील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि नायगावसह विविध भागांतील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
नांदेड तालुक्यातील ३३ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही रूई फिडरवरील अनियमित वीजपुरवठ्यामुळे बळेगाव, इजतगाव, मनूर, जांभरवाडी, सायखेड, रूई बुद्रुक आणि रूई खुर्द येथील सुमारे १०० ते १२५ शेतकरी अडचणीत आले आहेत. या फिडरवर एक तासही सलग वीज मिळत नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर खासदार चव्हाण यांनी महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता गाडेकर यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांना सलग आठ तास वीजपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नायगावसह विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या वीजजोडणीचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. वीजजोडणीसाठी आवश्यक रक्कम भरलेली असतानाही वीजबिल थकबाकीच्या कारणावरून काही शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा खंडित झाल्यास पिकांना पाणी देणे अशक्य होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे थकबाकीच्या कारणावरून शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडू नये आणि त्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली.
यावेळी सुरेश जाधव, देगलूरचे महावितरण कार्यकारी अभियंता पेंढारकर, नायगावचे उपकार्यकारी अभियंता, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील बेलकर, संजय पाटील इजतगावकर, गोविंदराव पाटील, गोविंद पाटील इजतगावकर, प्रकाश पाटील बेलकर, ज्ञानेश्वर पाटील बेलकर, विठ्ठल पाटील बेलकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
---
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
रूई फिडरसह संबंधित भागांतील वीजपुरवठ्याची समस्या पुढील १५ दिवसांत सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.