आणखी २४ हजारांवर शेतकरी कर्जमुक्ती यादीत
-------
-आतापर्यंत १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १८ ः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आणखी २४ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांचा नव्या यादीत समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून ११ सप्टेंबर रोजी पात्र लाभार्थींची पुढील यादी जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण १ लाख ६० हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे १ लाख ४ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. यापैकी लाभार्थींच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ४०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातच यादीत नाव आहे की नाही, याची पडताळणी करता येणार आहे. यादीत नाव समाविष्ट झाले म्हणजे कर्जमुक्तीची रक्कम तत्काळ कर्जखात्यात जमा होईल, असे नाही. लाभार्थी शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरच शासनाकडून मंजूर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या कर्जखात्यात वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे यादीत नाव असूनही प्रमाणीकरणाची प्रक्रिया अपूर्ण ठेवणाऱ्या लाभार्थींचा कर्जमुक्तीचा लाभ रखडण्याची शक्यता आहे.
---
((चौकट))
बँक, सेवा संस्था, पंचायतीत तपासा नाव
नव्याने प्रसिद्ध झालेल्या पात्र लाभार्थींच्या यादीत आपले नाव आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन तपासावे. ज्या बँक शाखेतून पीककर्ज घेतले आहे, त्या शाखेत तसेच संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायतीमध्ये यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादीत नाव आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. जिल्ह्यात अद्याप कर्जमुक्तीच्या प्रक्रियेत समाविष्ट न झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी पुढील टप्प्यांत याद्या जाहीर होण्याची अपेक्षा आहे.