पीक विम्याबाबत अपील फेटाळले;
दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १२ : खरीप २०२३ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल तक्रारींप्रकरणी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी विमा कंपनीच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना भरपाई नाकारू नये, अशी मागणी त्यांनी केली. राज्याचे कृषी सचिव तथा समितीचे अध्यक्ष परिमल सिंह यांनी याबाबत आदेश दिले. खरीप २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. अपेक्षित भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर अशोक चव्हाण यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यात सुमारे दीड लाख तक्रारी दाखल झाल्या. जिल्हास्तरीय समितीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. मात्र, हे अपील फेटाळण्यात आल्याने तक्रारदार शेतकऱ्यांना गावनिहाय निश्चित किमान नुकसान टक्केवारीपेक्षा अधिक भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.