ABD26J82076 जवळा पांचाळ ः शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीची तयारी करताना शेतकरी.
----
पाणीटंचाईमुळे रब्बीत हरभऱ्याला पसंती
-----
जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांकडून बागायती पिकांना फाटा
----
जवळा पांचाळ, ता. २५ (बातमीदार) : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ व परिसरात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वळले आहेत. विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्यामुळे रब्बी हंगामातील अधिक पाणी लागणाऱ्या पिकांना बगल देत शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. सध्या परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरातील भूजल पातळीवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. परिणामी, ऐन रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून रब्बीचे उत्पादन पदरात पाडून घेण्याचे मोठे आव्हान सध्या बळिराजासमोर उभे ठाकले आहे. जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांऐवजी कमी ओलाव्यावर तग धरू शकणाऱ्या हरभरा पिकाची निवड करून शेतकरी सध्या परिस्थितीशी जुळवून घेताना दिसत आहेत.
--
((कोट))
यंदा पाणीटंचाई तीव्र असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करताना मोठी अडचण येत आहे. विहिरींचे पाणी जास्त दिवस पुरणार नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही हरभरा पिकाची निवड केली आहे. हवामानाने साथ दिल्यास या पिकातून काही प्रमाणात आर्थिक हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.
- प्रवीण जाधव, शेतकरी, जवळा पांचाळ
--
((कोट))
पावसाचे प्रमाण घटल्यामुळे जमिनीत आवश्यक तेवढा ओलावा शिल्लक नाही. त्यामुळे जास्त पाण्याची गरज असणारी पिके घेणे यंदा शक्यच नव्हते. शेवटी कमी पाण्यात हमखास हाती येईल, या आशेने हरभऱ्याची पेरणी सुरू केली आहे.
- अजीम पठाण, शेतकरी, जवळा पांचाळ