पाऊस लांबल्याने चिंता वाढवली !...

पाऊस लांबल्याने चिंता वाढवली !...
Published on
पिकांनी माना टाकल्या; दुबार पेरणीही वाया ----------------- पाथरी तालुक्यात पावसाची महिन्यापासून दडी पाथरी,ता.३१ (बातमीदार)ः ऑगस्ट महिन्यात तब्बल ३० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पाऊस लांबल्याने पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने खरीप पेरण्यांनाही विलंब झाला. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पडली. त्यानंतर जुलैच्या अखेरीस एक दमदार पाऊस झाल्याने जमिनीत ओल निर्माण झाली आणि शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात पेरणी उरकून घेतली. पुढील काळात चांगला पाऊस होईल आणि पिकांना पुरेसे पाणी मिळेल या आशेवर खरीप हंगामाची तयारी केली. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिल्याने हि आशा आता चिंतेत बदलली आहे.ऑगस्ट महिन्यात सलग ३० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पाऊस नसल्याने जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत आहे. तापमानातही वाढ होत असल्याने पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे.पाऊस आणखी काही दिवस लांबला तर पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊन शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.ज्यांच्याकडे विहीर, कूपनलिका किंवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पिके जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ठिबक आणि तुषार संचाच्या माध्यमातून पिकांना पाणी देऊन हातातोंडाशी आलेला घास वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे आणि मोठ्या क्षेत्रावर पाणी देण्याची गरज असल्याने उपलब्ध पाणीसाठाही किती दिवस पुरेल, याची चिंता या शेतकऱ्यांना सतावत आहे.तर दुसरीकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असतानाही शेतकऱ्यांच्या हातात कोणताही पर्याय नसल्याने ते केवळ मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत.यंदा सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीसाठी बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा खर्च वाढला. अनेकांनी उसनवारी करून तसेच कर्ज काढून पेरणी केली. दुबार पेरणीनंतर पीक उभे राहिले असले तरी आता पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. ‘उसनवारी घेतलेले कर्ज कसे फेडायचे? वर्षभर घरचा प्रपंच कसा चालवायचा? मुलाबाळांचे शिक्षण, लग्नसमारंभ आणि इतर खर्च कसे भागवायचे? या प्रश्नांनी शेतकऱ्यांना अस्वस्थ केले आहे. पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर कर्जाचा डोंगर वाढण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. आता पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला तरच पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. अन्यथा खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ((चौकट))) शेतशिवार पडू लागले ओस पावसाच्या प्रतीक्षेत तालुक्यातील अनेक शेतशिवारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी पिके कोमेजू लागली असून हिरवेगार दिसणारे शिवार आता ओस पडण्याच्या मार्गावर आहे. पिकांच्या वाढीचा वेग मंदावला असून शेतकऱ्यांकडून पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. ((चौकट))) बाजारपेठेत शुकशुकाट शेतकऱ्यांचे उत्पन्न हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. खरीप उत्पादनात घट झाली तर त्याचा परिणाम पाथरी तालुक्यातील बाजारपेठेवरही होण्याची शक्यता आहे. शेतमालाची आवक कमी होणे, शेतकऱ्यांच्या हातातील पैसा घटणे आणि त्यातून व्यापार-व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी व व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com