शाखाधिकारीच नाहीत, पीककर्ज वाटप ठप्प!
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे हेलपाटे; ऐन दुष्काळात आर्थिक कोंडी
कळंब, ता. २६ (बातमीदार) : एकीकडे दुष्काळी परिस्थिती, दुसरीकडे शेतीच्या खर्चाची चिंता आणि त्यातच सण-उत्सव तोंडावर आलेले असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित शाखेत गेल्या महिनाभरापासून शाखाधिकारी नसल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. इरकूर, गंभीरवाडी, आडसूळवाडी, भोगजी आदी गावांतील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून पीककर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत; मात्र शाखाधिकारी नसल्याचे कारण देत त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित शाखेतील शाखाधिकाऱ्यांची १० ऑक्टोबर २०२६ ला बदली झाली. त्यानंतर नवीन शाखाधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा पर्यायी अधिकाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, महिना उलटत आला तरी अधिकारी उपलब्ध नसल्याने पीककर्जाची प्रक्रिया रखडल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्ज मिळत नसल्याने शेतीचा खर्च, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि अन्य जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणी येत आहेत.
दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसताना पीककर्ज हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असतो. मात्र, बँकेतील प्रशासकीय नियोजनाअभावी आर्थिक अडचणींत भर पडत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेचा फटका सामान्य खातेदारांनी का सहन करावा, असा सवालही उपस्थित होत आहे.
.....................
((चौकट))
सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा करणार
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शहर शाखेत शाखाधिकारी नसल्याने शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटप प्रक्रिया ठप्प झाली असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सहकार आयुक्तांसोबत बोलून हा प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
........................
((कोट))
पीककर्ज मिळेल या आशेने गेल्या अनेक दिवसांपासून बँकेत चकरा मारत आहोत. प्रत्येक वेळी शाखाधिकारी नसल्याचे सांगितले जाते. शेतीच्या कामांसाठी पैशांची गरज असताना कर्ज मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
- दत्तात्रय आडसूळ, गंभिरवाडी
........................
((कोट))
दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत पीककर्ज हा मोठा आधार असतो. मात्र, बँकेत अधिकारी नसल्याने आमची कामे रखडली आहेत. शेतीचा खर्च कसा भागवायचा आणि घरखर्च कसा चालवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शरद सुरवशे, आडसूळवाडी
........................
((कोट))
सण-उत्सव जवळ आले आहेत. घरातील खर्च, मुलांच्या गरजा आणि शेतीसाठी लागणारा पैसा यांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे. पीककर्ज वेळेत मिळेल या अपेक्षेने बँकेकडे जातो; पण प्रत्येक वेळी निराश होऊन परतावे लागते.
- बशीर शेख, भोगजी