गायरानावरील पिकांची नोंद होईना,
ग्रामस्थांना योजनांचा लाभ मिळेना
-----
जळकोट, ता. २१ (बातमीदार) : मौजे रावणकोळा येथील गायरान जमिनीच्या गट क्रमांक ६५, १४९, २६६, ४४९, २१९, १०९, ३३३ व १०३ या जमिनींची ऑनलाइन सातबाऱ्यावर गायरान म्हणून नोंद आहे. या जमिनीवर शेतकरी प्रत्यक्षात पिके घेत असले, तरी गट गायरान म्हणून नोंद असल्याने तलाठी कार्यालयात तसेच ई-पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंद होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच ऑनलाइन डीसीएस एमएच ॲपवर संबंधित गट दिसत नसल्याने या गटांतील शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज आणि नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात शेतकरी या जमिनीवर शेती करीत असल्याने स्थळपंचनामा करून त्यांच्या ताब्यातील पिकांची ‘पीकपाणी’ अथवा पीकपेरा नोंद करण्याचे आदेश तलाठ्यांना द्यावेत, अशी मागणी तहसीलदार राजेश लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ऑनलाइन नोंदीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून प्रत्यक्ष लागवडीची नोंद झाल्यास पीकविमा, पीककर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर सरपंच सत्यवान पाटील, फिरोज पटेल, बलिराम दिडे, गणपत दळवे, मधुकर वाघमारे, संग्राम वाघमारे, माधवराव वाघमारे, देविदास वाघमारे, गोपाळ वाघमारे आणि बाबू सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.